दिव्य शक्ती -मनं

प्रस्तावना
या पुस्तकामध्ये ,आपल्या सगळ्यांकडे असलेल्या मनाचा वापर करून, जगण्याची उमेद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. विज्ञानाने ही मान्य केले आहे की न्यूक्लियर शक्ती आहे. जगात सर्वत्रच आता मनाच्या चमत्कारावर विविध प्रयोग चालू झालेले आहेत. त्याच मनाच्या शक्तीचा उपयोग कसा करून आपण आपले जीवन कसे योग्य रीतीने जगू शकू याचे उदाहरणं सहीत स्पष्टीकरण दिलेले आहे.
रोजच्या दैनंदिन जीवनात न कळत होणार्‍या चुकांचा आपल्या कार्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो ते सांगितले आहे.
आपल्याकडे मन आहे,त्याच्यावर विश्वास ठेवून ठरवलेले ध्येय साध्य करायला नक्की मदत होते.प्रत्येकाची मनाची व्याख्या ही वेगळी आहे,कोणाला ते चंचल वाटते, तर कोणाला ते अंतर्मुख करायला लावणारे वाटते, कोणाचा तो आतील आवाज असतो. ज्याला मन कळते , त्याला सगळे कळले, असे उगीच नाही म्हणले जातं!
आपल्या कष्टाला,मेहनतीला ,सकारात्मक तेची जोड आणि मनाच्या प्रार्थनेची साथ मिळाली तर कोणताही मनुष्य कधीच अपयशी होणार नाही. या सगळ्यात त्याला लागणारे सातत्य आणि संयम हे ही तेवढेच गरजेचे आहे.
एक नवीन सुरवात करुयात जग जिंकण्यासाठी आणि त्यात यशस्वी होवू यात. हे पुस्तक तुम्हाला नक्कीच मदत करेन.
या सगळ्याचा वापर मी स्वत: माझ्या आयुष्यात केलेला आहे,खूप फायदेशीर असा त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर याचा उपयोग तुम्हाला नक्की झाल्याशिवाय राहणार नाही.

Subscribe to Channels

अनुक्रमणिका

क्रमांकविभाग
1मानवी मन
2स्व -संवाद
3सुप्त शक्ती- श्रद्धा
4भीती
5निर्णय
6नातेसंबंध
7स्वभाव
8व्याधी
9जिद्द
10जगण्यातील सारांश

मानवी मनं

Subscribe to Channel


आपल्याकडे अशी एक गोष्ट आहे,जी विश्वातील सगळ्या गोष्टींमध्ये अमूल्य आहे. पण आपण त्याचे मोल जाणत नाही,अगदी नकळत सहजतेने त्याकडे दुर्लक्ष करतो आणि नको त्या गोष्टींमध्ये गुरफटले जातो.
“मन वढाळं, वढाळं,उभ्या पिकातलं ढोरं
किती हाकला हाकला, फिरून येतं पिकांवर..
मन मोकाट मोकाट, याच्या ठाई ठाई वाटा,
जशा वार्‍याने चालल्या , पाण्यावरल्या रे लाटा..
मन पाखरू पाखरू,याची काय सांगू मात,
आता होतं भुईवर गेलं गेलं आभाळतं..
मन जहरी जहरी याचं न्यारं रे तंतर,
अरे विंचू साप बरा,त्याला उतारे मंतर..
मन एवढं एवढं,जसा खसखसचा दाणा,
मन केवढं केवढं, त्यात आभाळ माईना..
असं कसं मन देवा,असं कसं रे घडलं,
कुठे जागेपणी तुला,असं सपन पडलं..”
या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतील ओळी वाचल्यावर लक्षात आलेच असेन.आपल्याकडे असणार्‍या अमूल्य ठेवा म्हणजे आपले स्वत:च, आपल्या हक्काचं, आपले “मन.” मन कधी दिसले नाही कोणाला, कधी दाखवता पण आले नाही, पण अनुभवता मात्र सगळ्यांना आले आहे. काहींना त्याही पुढे जावून त्याची ओळख झालेली आपण रोजच्या दैनंदिन जीवनात पाहत असतो. आपले मन दिवसातले २४ तास कार्यरत असते,आपण नाही म्हणले तरी नको तिथे जाते,नको ते पाहून येते. छान असा आनंद घेते,ज्या गोष्टी आपल्याला हव्या असतात पण प्रत्यक्षात त्या आपल्या जवळ नसतात. त्या गोष्टी आपण मनामध्ये आणतो आणि रमून जातो. चांगल्या गोष्टींबद्दल विचार केला तर ठीकच आहे वो,कधीना कधीना ते चांगलच होणार. पण वाईट गोष्टींबद्दल काय!! हो,वाईटच होणार ना. कोणाला वाटते की आपले स्वत:चे वाईट व्हावे म्हणून; एकावेळी दुसर्‍याचे चालेन पण स्वत:चा तोटा कोणी करून नाही घेत. पण तुम्हाला महिती आहे का ,जसे चांगला विचार केल्यावर चांगलं होते,तसाच वाईट विचार केल्यावर पण वाईट च होते. त्या बरोबर आपण आपल्या अधोगतीकडे पहिले पाऊल टाकतो,कारण आपण वाईट निवडलेले असते. तुम्हाला असे वाटत असेन की आपल्या एका विचाराने असे काय एवढे वाईट होणार आहे,तर तो वाईट विचार सारखा सारखा मनात रुजणार आहे. तो पूर्ण करण्यासाठी सगळे विश्व,सगळे ब्रह्मांड त्याला मिळवून देण्यासाठी मदत करणार आहे. म्हणून आपल्या बाबतीत वाईट होते.म्हणून सगळे वाईट विचार काढून टाकून चांगले विचार करायचे आहेत.हे जरी पटत नसले तरी हेच खर आहे आणि त्यावर विश्वास ठेवुनच आपल्याला आपले आयुष्य आधिक सुखकर बनवायचे आहे. मा. कै. वामनराव पै यांनी सांगितले आहे की, “तु तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस.” हेच आंगीकरायचे आहे, आत्मसात करायचे आहे आणि त्याची सवय करून घ्यायची आहे. पण आता प्रश्न पडतो हे करायचे कसे,सगळे मान्य आहे की याला काही कोणती वस्तु लागत नाही किवा कोणाची मदत लागत नाही फक्त आपण स्वत: आणि आपले मन. तर चला आपण एक छोटीशी सुरवात करुयात,स्वता:ला बदलण्याची,एक संधी देण्याची,आपल्या मनातील आयुष्य जगण्याची, जे हव ते मिळवण्याची,जग जिंकण्याची आणि स्वत:ला शोधण्याची. स्वत:ला शोधायचा आहे,म्हणजे आपल्यातल्या त्रुटी, उणिवा ,नको असणार्‍या सवयी किंवा आपल्याला आपल्यातीलच बदलायला आवडणारी गोष्ट हे अगोदर शोधायला पाहिजे. असे करुयात आपण ते लिहून काढूयात आणि आपल्या प्रवासाला सुरवात करुयात.
आपली सृष्टी हीच मुळात परस्परावलंबी आहे. एक घटक दुसर्‍या घटकांवर आधारित आहे. सभोवतालचे विश्व,जग आपण नाही प्रत्येकवेळी बदलू शकतं. पण त्या मध्ये आपण स्वत:ला अगदी आनंदाने सामावून घेऊ शकतो. प्रत्येक गोष्टीचा उत्तर त्या मधेच दडलेले असते,ते फक्त आपल्याला शोधायच आहे. त्यासाठी आवश्यक आहे ते सकारात्मक विचारसरणी असलेले दिव्य मनं .

स्व-संवाद

Subscribe to Channel


स्वत:शी केलेला आत्म संवाद म्हणजे स्व-संवाद.आता प्रश्न पडला असेन की आपण हे कधी करतो म्हणून आपण मनातल्यामनात सारखं काही ना काही विचार करतो किवा काहीतरी गुणगुणत असतो. एक गोष्ट लक्षात आली का ,सगळ्यात जास्त काय कार्यरत असते ते आपले मन. आपण त्याला आपला सोबती बनवू शकतो ना ,जो कधीच आपली साथ सोडणार नाही असा. फक्त आपल्याला त्याच्याशी आशावादी गप्पा मारायच्या आहेत,सगळ्या सकारात्मक गोष्टी बोलायच्या आहेत. नाही , नको, जमणार नाही अशा शक्यता पण मनात आणायच्या नाही. बोलायला खूप सोप आहे पण ते करायला खूप अवघड आहे, आपल्याला त्याची सवय झाली की मात्र मग सगळे आपल्याला जे पाहिजे तेच होते.


खूप वेळा असे होते की आपल्याला करायचे एक असते आणि आपण करून बसतो एक. बोलण्याच्या बाबतीत तर असे होतेच होते. मग अशावेळी काय करायचे की आपण काय बोलून बसलो याचा आपण तर मनात विचार करतो. पण ही चूक कशी सुधारायची याचा विचार च करत नाही.थोडा सराव होई पर्यंत आपण ते एका वही मध्ये लिहून काढू यात रोज रात्री झोपताना आपण कसे वागलो आणि कसे वागणे अपेक्षित होते . याचा थोडा मेळ घालू यात.थोड्या दिवसांनी एकदा सवय झाली की आपण मनातल्या मनात हे सहज पणे करू शकतो. याचा अजून एक फायदा असा होईन की आपले नाते संबध बिघडणार नाहीत आणि उगीच पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही.
तर या सगळ्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त सकारात्मक बाबींचा च विचार करायचा आहे. ज्यावेळी खरच आपल्याकडे काही अडचणी चालू असतात, तेव्हा त्या परिस्थितीमधे चांगले विचार येणे फार कठीण काम होऊन जाते. अशावेळी आपण चांगल्या गोष्टी, चांगले विचार ऐकुन, पुस्तके वाचून मनाला नवीन आधार दिला पाहिजे आणि एक विश्वास पण काहीही झाले तरी हे दिवस निघून जाणार आहेत. आणि मला जसे पाहिजे तेच होणार आहे. मनामधे विचार रुजवण्यासाठी आपल्याला तो रोज मनामधे घोळावा लागणार आहे म्हणजे आपल्याला त्याची सवय होऊन जाईन आणि चांगले विचार येतील.
त्यासाठी आत्म संवाद जास्त गरजेचा आहे, ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे.

सुप्त शक्ती- श्रद्धा

Subscribe to Channel


आपण खूप नशिबवान आहोत की आपण भारत या सारख्या देशामधे जन्माला आलो. आपल्या कर्म भूमीचा वेगळा च नावाजलेला , गाजलेला इतिहास आहे. आपल्या परंपरेत श्रद्धेला अनन्य साधारण महत्त्व आहे. ती वेगळ्या रूपाने आपल्या समोर आली तो भाग वेगळा आहे. पण सांगायचे तात्पर्य एवढच की,आहे काही तरी असे जे आपले ऐकते,आपल्याला आधार देते. आपण ज्यावेळी मंदिरात जातो तेव्हा आपण खूप एकाग्रतेने अगदी मनापासून एक होऊन मोठ्या श्रद्धेने आपल्याला जे हवे ते मागतो,आणि आपली ईच्छा पूर्ण होते. हे खरच आहे, अस्स आपल्या आजी ने आपल्याला सांगितले तर ते आपल्याला पटणार नाही मुळीच,आपण त्याला टोलवण्याची उत्तरे देऊन रिकामे होतो. “अग,आजी मंदिरात जायला एवढा वेळ कुठे आहे आमच्या कडे,तुझा तो दगडातील देव काय करणार आहे.” अशी उत्तरे असतात आपल्याकडे ठेवणीतील.हे झाले आपल्या generation गॅप मुळे त्यांना आपल्याला पटवून देता आले नाही, त्या सुप्त शक्ती बद्दल जी विश्वात आहे,त्याच्याशी आपण एकरूप व्होयला पाहिजे,ती समजावून घ्यायला पाहिजे.
या शक्तीला आपण वेग वेगळ्या नावाने उल्लेख करू शकतो.पण अगोदर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला एका ठाम गोष्टींवर विश्वास ठेवायला लागेल की खरच एक अशी अदृश्य शक्ती आहे,जे आपल्याला मदत करणार आहे. हे खर आहे की मंदिरातल्या देवा समोर जी आस्थेने प्रार्थना करतो, ती प्रार्थना आणि आपण शांत बसून जी आपली मनातील ताकद आजमावतो, ती शक्ती दोन्ही सारखेच आहे. फक्त त्या प्राथनेमद्धे आपल्याला सकारात्मक विचारांचे बळ घालायचे आहे.
प्रश्न असा मोठा आहे की सुरवात करायची कशी,कारण आपल्याला एक गोष्ट नसते करायची ना! मग आपण एक काम करुयात एका पेजवर लिहून काढू यात की आपल्याला काय पाहिजे ,काय इच्छा आहे ते आपण लिहून काढू यात. नंतर त्यांचे छान अशी चित्रफीत मनातल्या मनात बनवून ठेवूयात आणि छान ती रोज जेव्हा आपले मन शांत असेन तेव्हा ते आपण रोज अगदी मनातल्या सकारात्मतेने, अगदी एकरूपतेने पाहुया आणि विश्वास ठेवायला मात्र कुठेही कमी पडायचे नाही. एक लक्षात ठेवायचे,पहिलं विश्वास ठेवायचे की आपले सगळे स्वप्न पूर्ण होणार आहेत. फक्त ती आपल्याला कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायची आहेत. अजून चांगलं लक्षात येण्यासाठी आपण काही उदाहरण पाहुया,आणि ही सगळे उदाहरण फक्त प्राथनेने च आणि परिश्रमाने शक्य झालेली आहेत.
प्रार्थनेमध्ये ताकद आहे, जे आपल्याला पाहिजे ते मिळवून देण्याची तयारी दाखवते. अशक्य गोष्ट पण शक्य करते. आपण फक्त इच्छा ठेवायची त्यासाठी सगळे ब्रहामंड आपल्याला मदत करते.

भीती

Subscribe to Channel


आपणाला माहीत जरी असले आपल्याला कुठे जायचे आहे आणि त्या गोष्टींवर आपण ठाम राहण्याचा निर्धार जरी केला तरी आपल्या सगळ्याच्या जवळ वढ्याळ असं मन आहे, जे नको त्या गोष्टीचा विचार करते आणि आपल्या मनात भीती चे नवे रूप तयार होते. जी मनात तयार झालेली भीती आपल्याला नकारात्मतेकडे घेवून जायला सुरवात करते. मनातील भीती घर करायला लागल्यावर, आपले स्वप्न पण त्यापुढे दुबळे होण्याला सुरवात होतात. जेव्हा आपण खूप समस्यांना तोंड देत असतो तेव्हा आपल्या मनात चांगले विचार कमी पण वाईट विचार जास्त येतात आणि भरकटले जाण्याची शक्यता जास्त वाढते. मनात ठाम विचार आणि त्यावरही निष्ठा जेवढी प्रबळ तेवढे आपण आपले लक्ष्य लवकर साध्य करू शकतो.
सुरवातीला आपण पाहुया की आपल्या मनात भीती येते कशाने, कशाची भीती आपल्याला जास्त वाटते. ते आपण अगोदर शोधून काढू यात म्हणजे मनातील भीती कमी करायला आपल्याला जास्त मदत होईन. सामन्यात: ज्यावेळी आपण सकारत्मतेकडे वाटचाल चालू करतो तेव्हा ,नेमकी सुरवात वाईट गोष्टीने आणि नकारात्मक विचाराने होतो. आपण एक लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे आपल्याला माहीत झालेले आहे आपल्याला काय पाहिजे आणि कशी प्रार्थना करायची आहे . फक्त आता नको असलेली भीती मनातून काढून टाकायची आहे.
आपल्या मनात भीती येते केव्हा, जेव्हा स्वतःवरचा आपला आत्मविश्वास खूप कमी असतो. तेव्हा आपले मन थोडेसे आजुबाजूला भरकटायला लागते. ते एका जागेवर स्थिर राहत नाही, आपल्या ध्येयापासून ते आपल्याला विचलित करते. मनामध्ये खूप ताकद आहे,जे आपल्यातील फक्त एका सकारत्मक विचाराने उभारी देते आणि तेच मन एका नकारार्थी विचाराने आपल्याला खाली आणते. ध्येयापसून मागे खेचते. त्यासाठी ज्या वेळी पण मनात भीती वाटेन कींवा वाईट विचार येतील,तेव्हा फक्त शांत बसा. कोणत्याही निर्णया वर पोहचू नका. शांत राहून तुम्ही जे पाहिलेले स्वप्न आहे, त्याची चित्रफीत डोळ्यासमोर घेवून या. तुम्हाला त्या पोजिशन ला पोचायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला मनात नको असलेली भीती दूर करायची आहे.
ज्यावेळी आपण ठरवतो की आपल्याला आता ट्रेकिंग ला जायचे आहे,त्यावेळी आपण एवढच लक्षात ठेवतो की मला त्या शिखरावर पोहचायचे आहे,आणि ते पण आपल्याकडे आज़चा दिवस आहे. ट्रेक नवीन असला तरी आपण थोडी फार माहिती आपण घेतलेली असते, पण प्रत्यक्षामध्ये आपण पहिल्यांदाच तेथे चाललेले असतो. आपल्या डोक्यात एवढेच असते की मला तिथे जायचे आहे. आपण तिथल्या अडचणी चा विचार अजिबात करत नाही,मनात भीती आली तरी शिखरावर पोहचण्याचा आपला निर्धार अटळ असतो. म्हणून कितीही अडचणी,भीती असली तरी आपण ठाम असतो आणि तिथे पोहचतो.
अगदी तसाच विचार करायचा आहे,मन एवढ मजबूत ठेवायचे आहे की तिथे पोहचण्यासाठी फक्त त्याला सकारात्मक विचारांचे खत पाणी घालायचे आहे,विचार दृढ असला की भीती आजिबात डोकावत नाही. मनातील भीती काढून टाकु यात आणि मन प्रबळ करुयात.

निर्णय

Subscribe to Channel


निर्णय जे सगळ्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. कधी कधी निर्णय घेताना आपण जास्त विचारविनीमय करत नाही. त्यामुळे सगळेच निर्णय बरोबर येतात असं नाही. बरोबर आलेले निर्णय आपल्याला फक्त यश आणि आनंद च मिळवून देतात. आपले आताचे आयुष्य हे आपण घेतलेल्या निर्णयांचेच फळ असते. आपण जे काही वर्तमान काळात असतो ते आपण घेतलेल्या भूतकाळातील निर्णायांनावरच आधारीत असते. त्यासाठी आत्म संवाद , आपले प्रार्थना आणि मनातून निघून गेलेली भीती जेवढी महत्त्वाची आहे तेवढेच आपल्या मनाने घेतलेले निर्णय ही आपल्या आयुष्यात महत्त्व पूर्ण भूमिका निभावतात.
निर्णयाचे दोन प्रकार मोडतात, पहिला म्हणजे जे आपण कधीच बदलू शकत नाही आणि दुसरे म्हणजे जे आपण थोड्या कालावधी नंतर त्या मध्ये बदल करू शकतो. एखाद्या निर्णयांवर येण्यापूर्वी चा प्रवास खरतर आपण कोणत्या प्रकारचे विचार करतो यावर खुप वेळा अवलंबून असतो. जर आपण एखाद्या गोष्टीचा सकारात्मकतेने विचार केला तर नक्कीच आपल्याला त्या विषयातील सगळे पॉझिटिव बाजू दिसतील.पण याच उलट जर आपण नकारार्थी विचार केला तर ती गोष्ट कशी वाईट आहे ,तेच आपल्या समोर येते.


जर एखाद्या वेळी आपण घेतलेले निर्णय चुकीचा आहे , अस लक्षात येते तेव्हा आपल्या समोर दोन बाजू असतात. तो आहे तसा स्वीकारणे कींवा तो पुर्णपणे बदलणे. जर आपण आहे तसा तो स्विकारला तर आपल्या मध्ये त्या नको असलेल्या गोष्टींमुळे नैराश्याची भावना जागृत होते. सगळ्या गोष्टींमधील रस निघून जायला लागतो आणि जीवन निरर्थक वाटायला लागते. आयुष्य संपवायचे विचार डोक्यात येतो. जे झाले ते नको होयला होते,आज मी दुख: स्वीकारले आहे. असे खूप लोकांच्या वाट्याला नैराश्य आलेले आपण ऐकत असतो. पण योग्य वेळी घेतलेला निर्णय जरी चुकीचा वाटला तरी आपण बदलू शकतो, पुढचे सगळे जीवन चुकीच्या वाटेने घालवण्यापेक्षा,वेळेवर निर्णय बदलेलं कधी पण चांगला!
निर्णय जरी चुकीचा असला आणि तो आपण बदलू शकत नसलो तर आता करायचे काय ! पहिले गोष्ट तो आहे तसा स्विकारणे. नंतर त्याच्या दोन्ही बाजू व्यवस्थित लक्षात घ्यायच्या, खूप गोंधळ होत असेन तर त्या एका पेज वर लिहून काढूयात. पॉझिटिव पॉईंट्स आणि निगेटिव्ह पॉईंट्सची, लिस्ट करुयात. त्या नंतर निगेटिव्ह गोष्टी मध्ये आपण त्या कशा प्रकारे असायला पाहिजे होत्या ,त्या बद्दल आता आपण विचार करुयात. मनात तशी प्रार्थना करुयात. कोणताही वाईट विचार न करता, ती अशीच का आहे याची तक्रार न करता त्या आपल्या पॉझिटिव विचारसरणी मध्ये बदलून टाकु यात.” आपल्याला जे पाहिजे तसेच होणार आहे. सगळे कसे छान आहे,मी खूप खुश आहे”, अशी रोज आपण निगेटिव्ह मधून पॉझिटिव मध्ये केलेल्या गोष्टींवर एक छोटासा मनाच्या प्रार्थनेचा प्रयोग करुयात. या प्रयोगा मध्ये नक्की तुम्हाला यश मिळेल.

नाते संबंध

Subscribe to Channel


“जगण्याला आधार म्हणजे नाती ,
प्रेमाचा सागर म्हणजे नाती ,
जीवनाचा अमूल्य ठेवा म्हणजे नाती !”
“काय आहे रे तुझ्या जवळ, चार माणसे तरी आहेत का? अस कोणी आहे का , जे तुझ्या जीवाला जीव देवू शकेल का वेळ आल्यावर? ” अस सारखं आपल्या कानावर पडलेले आपण ऐकलेले असते. या कोरोना च्या काळात तर आपण खूप जवळून पहिले की आपण काय कमावले आणि काय गमावले आहे. आपल्या आयुष्याची खरी कमाई काय आहे ते, या सगळ्या काळात आपण सगळ्यांनी जवळून पहिले.
नाती हेच आपल्या आयुष्याची खरी कमाई आहे ,हे कोरोना सारख्या साथी ने दाखवून दिले आहे. आपण किती यशस्वी नाते जपले आहे,त्याचा आरसा सगळ्यांच्या डोळ्यासमोर तर उभा असेनच. नाते कसे असावे आणि कसे जगावे , चिरकाळ कसे टिकवावे हे कठीणच होवून च जाते.
मनापासून जपल्या जाणार्‍या नात्याला कोणत्याच गोष्टींचा आधार लागत नाही,ती नाती आपोआप जपली जातात. अशा नात्या मध्ये प्रेम, आदर ,आपुलकी असतेच. या सगळ्या नात्यांना मनाची परवानगी असते. जिथे मन राजी तिथे कशाचाच अभाव राहू शकत नाही. पण नात्या मध्ये चढ -उतार हे येत असतात. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते,ती समजून घेतली पाहिजे. जी नाती घट्ट ऋणांनुबंधांची असतात,ती कोणत्याही परिस्थीती मध्ये टीकवली जातात. पण आता आपण नात्यांच्या दुसर्‍या बाजू बद्दल बोलूया. आयुष्यात अशी काही नाती असतात, जी आपल्या मनाला तर अजिबात नको असतात पण ती आपल्या जबाबदारी मुळे किवा आपल्या कर्तव्यामुळे आपल्याला ती जपावी लागतात. अशा नात्या मध्ये प्रेमाची भावना कमी असते आणि फक्त एक औपचारिकता राहते. पण नेमकं होते काय, ईच्छा नसताना नाते सांभाळावे लागते म्हणून वेगळ्याच प्रकारचे दडपण मनामधे यायला सुरवात होते आणि दड्पनाची जागा तिरस्कारा मध्ये होते. नको वाटायला लागते त्या व्यक्ती बद्दल, नको ते वाईट विचार येतात. त्या सगळ्यांचा परिणाम आपल्या आनंदी जीवनावर होतो.
सगळ्यात आधी आता आपल्या मनाला तयार करावे लागेल,” का , रे त्या व्यक्ती नको आहेत , तुला? एक नवीन सुरवात करावीशी वाटते का, बिघडलेली नातेसंबंध सुरळीत करायचे का?”
मन थोडे शांत होईन,कारण ते पण कंटाळले आहे, या वाद -विवादाला त्याला पण बदलायचं आहे. सुरवातीला आपण काही गोष्टी लक्षात घेवू यात की नाते आपल्याला जपायचे आहे पण ते जपताना आपण पण खुश राहायचे आहे.
पहिले गोष्ट म्हणजे अपेक्षा ! हो, दु:खाचे मूळ कारण हेच आहे. आपण जेव्हा कोणासाठी काही तरी करतो तेव्हा अपेक्षा ठेवणे मानवी स्वभाव आहे. पण ते सुरळीत चालावे असे वाटत असेन तर अवाजवी अपेक्षा ठेवणं ही बंद करा.
दुसरी गोष्ट म्हणजे, ग्राह्य धरणे. आजिबात एखाद्याला प्रत्येकवेळी ग्राह्य धरू नका आणि आपला मूड खराब करून घेवू नका. कसे आहे ना, प्रत्येकाचे आपले असे आयुष्य असते, त्याच्या मना नुसार सगळ्याच गोष्टींचा स्तर ,Prorities ह्या वेगळ्या आहेत. त्या आपण लक्षात घ्यायला हव्यात. म्हणजे आपण प्रत्येकवेळी त्या एका व्यक्ती बद्दल आग्रही राहणार नाही. नको तो गैरसमज मनात येणार नाही.

तिसरी गोष्ट म्हणजे, वाद नको सुसंवाद पाहिजे.
चौथी गोष्ट म्हणजे कोणाची निंदा करू नका, तोंडावर पण नाही आणि मागे तर बिलकूलच नाही. त्या व्यक्ती बद्दल कोणताही वाईट विचार करू नका. उलट प्रार्थनेच्या मदतीने तिच्याबद्दल फक्त चांगले बोला, तीने आपल्याशी कसे वागावे ,आपले नाते कसे असले पाहिजे याचा विचार करा. मागे सांगितल्या प्रमाणे कोणताही नाकारर्थी विचार अजिबात डोकावून देवू नका. सगळे कसे छान आहे आणि छान च होईन अशी अपेक्षा बाळगा. अर्थात त्याची सवय अंगिकारा.

पाचवी गोष्ट म्हणजे नात्यांमधील अबोला हा फार काळ कधीही टिकू देवू नका. वेळेत तो मिटवून घ्या, नसेन मिटवता येत तर तो तुमच्या मनातील कप्प्यातून कायमचा वगळून टाका आणि तिचा परत उल्लेख ही करू नका. ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये मध्ये माऊलींनी सांगितले आहे की माघार कोणी घ्यायची म्हणून,ते सांगतात ज्यांना सुखी होयचे आहे ! अहंकार हा नात्यांना सर्वात मोठा सुरुंग लावणारी वात आहे. अहंकाराची वात विझवण्यातील मजा ज्याला कळाली तो खरा सुखी, हे आपण ज्ञानेश्वरी मध्ये पाहिले असेन.

सहावी गोष्ट म्हणजे,ज्यावेळी आपण एखाद्याला नव्याने भेटतो तेव्हा त्याला आदर आणि आत्मसन्मान दिलाच पाहिजे. ही गोष्ट आपण कधीच विसरायला नको. जसे एखादया छोट्याशा रोपट्याला आपण खत , पाणी घालून त्याला मोठे करतो, त्याची काळजी घेतो तसेच ते मोठे झाल्यावर गोड गोड फळे देते, पक्ष्यांना राहण्यासाठी जागा देते , ते पण खुश असते आणि इतरांना ही सुखी ठेवते. तसेच सगळ्याच नात्यांची काळजी घेवून आपल्याला संगोपन करायचे आहे, मग फळं आपोआपच मिळते.
कारण,ज्यावेळी आपले मनाला सगळे पटेल तेव्हा सगळे नातेसंबंध छान आणि समाधानाने जपले जातील, त्यासाठी रोज न चुकता मनाची प्रार्थना करायची आहे.
आपले थोर संत समर्थ रामदास स्वामी यांनी एक मंत्र संभाजी महाराजांसाठी सांगितला होता तोच मी तुम्हाला सांगते,”शिवरायांचे सलगी देणे कैसे असे” . हाच मंत्र आपण पण लक्षात ठेवू यात.
जेवढी माणसे आपण कमावु तेवढे आपण श्रीमंत असतो. आता आपल्याला मनातील सगळा द्वेष दूर करुयात आणि मनात सकारात्मक विचारांची प्रार्थणा करुयात ,त्यावर विश्वास ठेवूयात.

स्वभाव

Subscribe to Channel


अशी म्हण आहे आपल्याकडे,”स्वभावाला औषध नाही.” कधी विचार केला आहे की असे का म्हणले जाते. अजूनही आपण बर्‍याचवेळा हे ऐकत असतो, माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलू शकणार नाही. आणि हे पण ऐकले असेन,पहिल्यापेक्षा खूपच यांच्यामध्ये बदल झाला आहे, मग तो चांगला किवा वाईट असतो. म्हणजे सांगायचे हेच की स्वभाव बदलू शकतो. तो बदलतो याचा आपण स्विकार करायला पाहिजे. चला आता, आपण आपल्या मनाला काम देवूया.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, हाज़ विचार डोक्यातून काढून टाकुयात कीं ,”स्वभावाला औषध नाही.” आपला स्वभाव आहे ना, मग उत्तर पण आपल्याजवळ च असणार ना!
जेवढ्या लवकर आपण तो बदलण्याचा विचार करू तेवढा तो लवकर बदलेन. फक्त बदलायचे आहे म्हणून तो बदलणार नाही.
गीता, स्वभाव खूप करारी. तिने मान्य केल होते की मी खूप तडफदार आहे, कडक आहे. स्वावलंबी आहे. मी जे काही काम करेन तेच योग्य आहे. खर सांगायचे तर ती होती पण अगदी तशीच तिचे कौतुक करावे तेवढे कमीच होते. त्यामुळे काय झाले तीचा आत्मविश्वास वाढत गेला आणि तिला सगळे कामे स्व:ताच करायची सवय लागली. दुसर्‍याने तीला मदत केलेली अजिबात पटायचे नाही. कोणी कितीही मनापासून कोणी मदत केली तरी तिला ती नावे ठेवायची. जो पर्यन्त तिच्यामध्ये बळ ,ताकद होती तोपर्यंत सगळे ठीक होते. पण शरीर आता थकले होते, म्हणावं अस काही कष्टाचे काम आता होत नव्हते. आता तिला इतरांची मदत घ्यावी लागत होती. पण काही केल्या तिला ते पटत नव्हते. त्यामुळे जरी कोणी मदत केली तरी तिला त्या मध्ये चुका दिसायच्या आणि ती स्व:ताला त्रागा करून घेयची. कामाला नावे ठेवायची आणि त्या व्यक्तीला ही त्याच्या कामा बद्दल अपमानास्पद वागणूक द्यायची. त्यामुळे झालं काय की तिला आता मदत करणार्‍यांची संख्या कमी झाली. त्यामुळे तिची अजुनच जास्त चिडचिड होवू लागली होती. आता तिच्या लक्षात आले होते की कुठेतरी आपलेच वागणे चुकीचे आहे. आपण थोडे ते बदलायला पाहिजे. तिच्या अशा वागण्याने तिचे सगळे जवळचे आत्म स्वकीय दुरावले गेले होते. आता खरच बदलायला पाहिजे. तिला हे फक्त तिच्या आत्मसंवादामुळे लक्षात आले. तशा तिने मनाला प्रार्थना करायला सुरवात केली,”माझा स्वभाव आता पहिल्यापेक्षा जास्त चांगला होत आहे,मला सगळ्यांनी केलेली मदत खूप आवडते. त्यांचे मी तोंड भरून कौतुक करते आणि त्यांना प्रोहत्सान ही करते.” अशी ती रोज शांत प्रार्थणा करते. तिच्या या प्रार्थनेचा फळ ही तिला लवकरच मिळाले. तिने तिचा स्वभाव बदलला होता.
जीवनाच्या कोणत्या वळणावर आपण आहोत, हे जाणून घेण्यासाठी रोज आत्म संवाद करणे खूप गरजेचे आहे. मनाची ताकद आणि त्यावरचा विश्वास सगळ्यात मोठे हत्यार आहे, जे आयुष्यातील कठीणातील कठीण लढाई जिंकून देण्यासाठी मदत करेन.

व्याधी

Subscribe to Channel


शरीराला आणि मनाला लागलेली कीड, .”जी कधीच बरी होणार नाही. जेव्हा आपले आयुष्य संपेल तेव्हाच ही कीड माझ्यासोबत जाईन. ‘मला ना आता परमेश्वरा लवकर यातून मोकळे कर रे! शेवटचा श्वास घेवू दे !’ असं कोणी ऐकले नसेन,असा माणूस सापडणे म्हणजे भाग्याचीच गोष्ट झाली.”
मान्य आहे, जिथे आजार तिथे वेदना आल्याच ! कोणालाच वाटत नाही, की स्व:ताला काहीतरी व्याधी जडावी. आजारपणात आपले आयुष्य घालवावे, तुम्हाला तर माहीत आहे, जीवन कोणाला नको आहे !
“आरोग्यम् धनसंपदा” , मनुष्य जीवनातील सगळ्यात मोठी ताकद जर काय असेन तर ते आहे आरोग्य, निरोगी जीवन ! सगळ्यांना हवे हवे असणारे ,कुठलीच तक्रार नको असते. सध्याच्या काळात, औषधांची जादू जरी चालत असेन ना ; तरी त्रास अटळ आहे वो ! औषधे तरी कुठे गोडं असतात !
असो, यावर आपले मन कसे कार्य करेन ते पाहुया. माझ्या आरोग्यासाठी मी काय करतो, फक्त चांगला आहार च घेतो का त्याला थोडासा फ्रेशनप येण्यासाठी व्यायाम करतो का, वेळेवर शरीराचे म्हणणे ऐकतो का, ते आपल्याला भौतिक खुश ठेवण्यासाठी अहोरात्र कष्ट करत असते. त्याची काळजी तर आपण घेतली पाहिजे ना ! समजा, त्याची काळजी घेवून पण जर व्याधी असेल तर ??
जरी एखादा आजार असेल किवा काही अनावधानानेच अपघात झालेला असेन तर करायचे काय ? तर तो मलाच का झाला? असा विचार न करता ; तो आहे तसा स्वीकारा. आता, तो आपल्याला नको आहे ,त्यातून बाहेर पडायचे आहे. त्यासाठी आपण मनाचा आधार घेणार आहोत. कितीही वेदना होतं असल्यातरी तरी शांत प्रार्थणा करा की ” मला कोणताही त्रास होत नाही,मी पाहिल्या सारखा छान सगळ्या गोष्टी करत आहे. माझे आरोग्य उत्तम आहे आणि ते मला खूप छान प्रतिसाद देत आहे.” अशी रोज प्रार्थना करायची आहे, आणि दिवसभरात आजारपणाकडे लक्ष बिलकूल द्यायचे नाही. हे करणे तसे फार कठीण आहे,पण आपल्याला ह्या मूळ व्याधी पासून सुटका पाहिजे अस वाटतं असेन तर हे करणे गरजेचे आहे. हळू हळू त्यातील फरक जाणवू लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या शरीरावर डॉक्टर ने केलेल्या उपचारचा आणि औषधांचा चांगला परिणाम होत आहे. असे सगळे सकारात्मक विचार करायचे आहेत आणि त्यावर विश्वास ठेवायचे आहेत. या सगळ्यामध्ये नकारार्थी विचार अजिबात मनात आणायचे नाही. मनाचा अजिबात गोंधळ झाला नाही पाहिजे; मनाला त्याचे काम सुरळीत करून द्यायचे आहे.
मनाने जरी फक्त चांगले विचार- आचार जरी ग्रहण केले तर नक्की तुमच्या मनासारखे होईन.
दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आपण जवळच्या लोकांना आपण त्यांच्या आजारपणावर मात करायला मदत करु शकतो. जेव्हा कधी आपण आजारी व्यक्तीला भेटायला जावू तेव्हा त्याच्यासाठी आपण सकारात्मक विचार करुयात जसे की तुझ्या तब्येती मध्ये छान सुधारणा झाली आहे आणि तू लवकरच बरा आणि पाहिल्या सारखा छान होणार आहेस. आपल्या अशा चांगल्या विचाराने त्याला आधार मिळणार आहे आणि लवकर बरे होण्यासाठी बळ पण भेटणार आहे.
मा. शरद पवार हे आपल्या समोरचे ज्वलंत उदाहरण आहे. त्यांना कॅन्सर सारखा आजार असताना वयाच्या ७९ वर्षी सुद्धा ते खूप जोमाने काम करताना तर आपण पहिलेच आहे. त्यांनी ठरवले असते ,तर ते निवांत मजेशीर जीवन जगू शकले असते. सातत्याने समाजासाठी कार्यरत राहण्यासाठी ते आग्रही असतात. त्यांच्या कडून प्रेरणा घेवून खूप काही शिकता येण्यासारखे आहे.
जिद्द

Subscribe to Channel


रोहन,एका वर्षाचा जेव्हा घर डोक्यावर घेवून ओरडतो,एखाद्या वस्तूसाठी ! त्याला काही माहीत नसते,त्याला फक्त एवढेच माहीत असते की मला ती वस्तु पाहिजे,कोणत्याही परिस्थीती मध्ये. त्याचा काय उपयोग होणार आहे का? त्याची किंमत काय? ते घेण कितपत योग्य आहे. तसा विचार केला तर हे सगळे कळायला तो अजून लहान च आहे. त्याच्या डोळ्यांना ती आवडली म्हणून त्याला पाहिजे असते. लगेच काय होते, टॅग लावला जातो. “काय गं, रोहन किती हट्टीपणा करतोय, खूपच हट्टी दिसतोय, अशी सवय चांगली नाही ; बरं का !” लहानपणी रोहन ने त्याच्या आवडीच्या वस्तूसाठी धरलेला हट्ट वाईट च होता. लहानपणी धरलेला हट्ट, आणि मोठेपणी तोच हट्ट,यशस्वी ध्येय प्राप्ती साठी ठेवलेली जिद्द हा बदलण्याचा प्रवास,सगळ्यांनाच जमतो असं नाही. ज्याला जमतो तो नक्की जग जिंकल्याशिवाय राहत नाही.
जेव्हा आपण लहान असतो ,तेव्हा डोळ्यांना आवडलेल्या गोष्टीसाठी वेडे असतो. पण त्यावेळची सगळी ताकद लावून आपण ती मिळवतो. पण तीच ताकद वाढण्यापेक्षा कमी का बरं होते ? जेव्हा आपण मनाने, वयाने , मेंदूने, शरीराने आणि स्वप्नानी वाढत असतो ;मग जिद्दीने मागे का राहतो? याचा कधी विचार केला आहे का? आता तर आपल्याला माहीत आहे की काय चुकीचे आणि काय फायद्याचे ,मग आपण मागे कसे राहिलो. जेव्हा जगं पुढे चालले आहे, तेव्हा आपण मागे का? काही चुकतंय का, स्वत: कडून चं! कारण आपला लहानपणीचा हट्ट होता, तोच हट्ट फक्त आता जिद्दीमध्ये बदलायचा आहे. मनाला सांगायचे आहे की ” मी खूप हट्टी आहे, आता त्याला मी माझ्या कष्टाची आणि बुद्धीची जोड देत आहे. मला पाहिजे ते मिळवायला मला ते मदत करत आहे.”
मनालाच जिद्दी बनवा, आपोआप सगळे तुम्हाला अवगत झाल्याशिवाय राहणार नाही.
अजून सांगायचे म्हणजे सगळ्यात बेस्ट असं, पक्षांचा राजा गरुडाची कहाणी. त्याच्या जगण्याची कथा. गरुडाला ७० वर्षाचे आयुष्य असते. पण जेव्हा तो ४० वर्षाचे होते,तेव्हा त्याची चोच ,पंख आणि पायाची नखे खराब होतात. त्यांच्या मधले कार्य करण्याची क्षमता कमी होते. त्याच्या पुढे दोन पर्याय असतात. एक म्हणजे मरण स्वीकारणे आणि दुसर म्हणजे त्याच्या पंखाने उभारी देणे. मरण स्विकारेन ते गरुड कसले! त्या साठी त्याला उंच शिखरावर जावे लागते, तिथे जावून त्याला त्याची चोच खडकावर मारून तोडावी लागते त्यावेळी होणार्‍या यातना खूप त्रासदायक असतात. त्याचे चोच, नख्या तो खडकावर घासून घासून तोडून टाकतो आणि त्यानंतर सहा महिन्यातच त्याला नवीन चोच आणि पंख येतात. हे सगळे कधी शक्य झाले, त्याच्याजवळ असणार्‍या जगण्याच्या जिद्दीने, म्हणूण सगळे म्हणत असतात. गरुडसारखी जिद्द असावी जगण्यात; कितीही हाल अपेष्टा सहन करण्याची सहनशीलता ! जिद्दीपुढे सगळे काही छोटे असावं,म्हणजे स्वप्न नक्की पूर्ण होते.

सातत्य आणि संयम

Subscribe to Channel


सुरवात आणि शेवट हे एकाच गोष्टीवर अवलंबून असते, ते म्हणजे ‘सातत्य.’ सुरवात खूप जोमाने होते,नवीन सगळ्याच गोष्टींची,उत्साह नवा,उमेद नविन असतो.मग कमी पडते ते त्यामधील सातत्य. नविन शिकावं, नविन गोष्टी करत रहाव्यात सगळ्यांनीच त्यामुळे ज्ञानामध्ये वाढ होते. सातत्य शब्द जरी छोटा वाटत असला तरी त्याची ताकद खूप आहे.
असं म्हणले जाते, “तूप खाल्लं की रूप येतं नाही लगेचं”, “पी हळद,हो गोरी”. असे बर्‍याच वेळा आपण ऐकले असेनच.ते सगळं एका दिवसात नाही होत कधी. त्यासाठी ती गोष्ट आपल्याला रोज करावी लागते. म्हणजे हो,त्यामध्ये सातत्य ठेवयाला लागते आणि तेवढाच संयम पण!


सातत्य आणि संयम या दोन गोष्टींसाठी मनाची तयारी लागते, तेवढे मन शांत लागते. मन शांत नसेल तर आपण ध्येयापासून चलबिचल होवू शकतो. सातत्य आणि संयम या दोन गोष्टी प्रार्थना सारख्या आहेत. त्यासाठी धैर्याची साथ आवश्यक आहे. ती प्रयत्नांनी आपण अवगत करू शकतो.
तेजा, हुशार, नियोजन अप्रतीम ! हुशार आणि नवीन गोष्ट शिकण्याची आवड तीला कधी चं शांत बसू देत नसे. यामुळे तिच्यासाठी काही येत नाही असं, काही राहिलेच नव्हते. जे काही नविन असेन ते लगेच ती शिकून घ्यायची आणि आत्मसात करायची. जसे ती नवीन शिकत होती तसेच तीचे छंद ही वाढते गेले. पण मन मात्र अशांत राहिले. कोणत्याच गोष्टींवर ते टिकून नाही राहिले. छंदासाठी ते ठीक होते पण कुठे तरी आता स्थायी होण्यासाठी अवघड होते. त्यामुळे झाले काय कोणत्याच कामा मध्ये ती टिकून राहू शकले नाही. नवीन शिकण्याच्या अट्टहास तीला शांत बसू देत नव्हता. पण आता तिला शांत होयचे होते, भविष्याच्या दृष्टीने ,पैसे कामावण्याच्या दृष्टीने आणि कुठे तरी आता तीला स्थायिक होयचे होते. पण या सगळ्यात जास्त कमतरता होती सातत्य ! मनाला सवय लागली होती ना,लगेच शिकायचे की लगेच मिळवायचे आणि लगेच पुढे नवीन गोष्ट. अशावेळी एकाच गोष्टीवर टिकून राहणे, जो पर्यन्त आपण आपले ध्येय गाठत नाही तो पर्यन्त खूप कठीण काम होवून जाते.त्यात संयमाचा अभाव म्हणले की मग तर खूपच असह्य होवून जाते.
ध्येयाप्रती जेवढी मेहनत उपयोगी असते ,तेवढीच सातत्य आणि संयम सुद्धा! तेजा च्या या गोष्टी लक्षात आल्या होत्या,मन शांत करून तीने या गोष्टीवर विजय मिळवला होता.
सातत्य आणि संयम जर आपल्यात नसेन ना तर हाती आलेले यश ही मिनिटामद्धे आपल्यापासून दूर होते. स्पर्धा परीक्षा याचा अभ्यास करणारे विद्यार्थी ही गोष्ट खूप जवळून समजतात. ज्या ह्या गोष्टी पाळतात तेच पुढे जावून अधिकारी बनतात.
शांत मन ,सातत्य आणि संयम ह्या तीन गोष्टींचा मेळ घातला तर कोणतीच गोष्ट अजिबात अश्यक्य नाही.

जगण्यातील सारांश

Subscribe to Channel


जीवन तर सगळेच जगतात पण आपल्याला मनाची साथ घेवून आपल्याल्या पाहिजे तस जीवन जगायचे आहे. जवळपास सगळी उत्तम, आयुष्य जगण्याची तत्व माहीत झालीच आहे. त्याचा आपण दैनंदिन जीवनात उपयोग करायचा आहे.
आपण स्वत: सकारात्मक तर व्हायचे आहे आणि आपल्या जवळच्या सगळ्यांना पण सकारात्मक होण्यासाठी मदत करायची आहे.
लहान मुलांपासून सुरवात करायची झाली तर, ‘हे करू नको, ईथे जावू नको, त्याला हात लावू नको,तू ना काहीच करू नको !’ असे नको तेवढे नकारार्थी वाक्य त्याच्या कानावर नकळत पडली जातात. हे कोणाच्या लक्षात ही येत नाही. जरी ठरल्या प्रमाणे बदल करायचा आहे तर मग सुरवात नकारार्थी संवादाने कशी होईल,त्यासाठी सकारत्मक बोलायला सुरवात करुयात. त्याचा सराव करा. लहान मुलाला तसे वेगळ्या भाषेत सांगायला सुरवात करा आणि त्याचा परिणाम ही लगेच तुम्हाला दिसेल.
मुलांना वाढवताना ,त्यांचे संगोपन करताना अजून एक चूक सगळ्याच पालकांकडून नकळत पणे होते. ती म्हणजे पाल्याच्या चुकांवर लक्ष केंद्रीत केले जाते. खरतर हे खर आहे, जिथे चुकत आहे मूल तिथे पालकांनी त्याला दाखवून देणे गरजेचे आहे. परंतु ; जेव्हा चूक दाखवून देता तेव्हा ती बरोबर कशी करता येईन हे ही तुम्हीच दाखवून द्या. त्यांच्या चुका उगाळत बसू नका. त्यांना वेळोवेळी प्रोत्साहीत करत रहा. प्रत्येक मुलासाठी आई -वडील अशी जागा आहे की जगातील कोणत्याही जागेची तुलना करू शकणार नाही. त्याचे मोल जाणा आणि सजग होऊन आपल्या पाल्याला सुंदर आयुष्य जगण्याला बळ द्या.
त्यातूनही जर तुम्ही शिक्षक असाल तर,तुमच्या हाती, लाखो विद्यार्थ्याचे उज्ज्वल भविष्य अवलंबून आहे. शाळेत ‘ढ’ असलेली मुले ही पुढे आयुष्यात जीवनाच्या पटलावर उत्तम गुणांनी पास झालेली बरीच उदाहरणे आपणा कडे आहेत. त्यांना मदत करा,त्यांच्या सुप्त गुणांना ओळखायला आणि यशस्वी करायला.
मनाचा अजून एक सांगायचे म्हणजे आपल्या जवळ ज्या गोष्टी आहेत किवा ज्या गोष्टी असाव्यात असाच फक्त विचार करा आणि त्यावर विश्वास ठेवा.
आशा आहे की तुम्ही सगळे याचा उपयोग तुमच्या जीवनात कराल, आणि सगळ्यां जवळ बहुमूल्य असलेल्या मनाचा चांगल्या रीतीने उपयोग कराल.

Don’t Forget to Visit ⬇️⬇️& Click On🔔

http:/nutrirecipes.inspireinmarathi.com

Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: