मराठी कथा-कादंबरी-लेख Blogs- Entertainment- Travel- Food

"वाचत राहा,जगण्याला प्रेरणा मिळण्यासाठी📖 Stories| Reviews| Entertainment | Greetings | Travel | Food

लघुकथा संग्रह

एक आटपाट नगर…. नो नेटवर्क….

तस खास काही ठरवून गेलो नाही…

सहजच कोरोना मूळे बसून बसून घरात कंटाळा आला होता म्हणूनच म्हणलं…

थोड बाहेर पडुयात…नाजूक पुण्यातून आणि नाजूक गाडीतून,नाजूक जगातून खऱ्या आयुष्यात जगायचं होते….

व्हिटॅमिन डी च्या पण गोळ्या खाव्या लागतात…

सकाळचं कोवळं ऊन पण नशिबात नाही,याच्या पेक्षा दूर्भाग्य कसलं आहे….

या सगळ्याचा खोलात विचार करायला पण वेळ नाही, घेतली गोळी आणि खाल्ली… झालं सगळं…

आयुष्याचं जगणं म्हणजे काय तेच समजेना झालाय….

असो..

“जायचं कुठे पण,काही ठरवलं आहे का??” यश..

“म्हणजे अस,खास नाही काही पण माझ्या मैत्रिणीच गाव आहे,तिथे भाताची शेती आहे ,खेकडे पण असतात ,तिथेच जाऊयात, सकाळी जाऊयात आणि संध्याकाळी माघारी येऊयात” नेहा म्हणाली.

“हो,पण जेवणाची काय सोय,तुझी मैत्रीण राहते का तिथे अजून” यश.

“नाही राहत ती,पण तिचे चुलते आहेत त्याच्याशी बोलणं झालाय ते म्हणालेत या म्हणून आणि आपण पण थोडे पुण्याची चविष्ट पदार्थ घेऊन जाऊयात” नेहा आवरत म्हणाली..

“ठरलं तर मग ,बरोबर सकाळी सहा वाजता ,निघायचं”यश दोन्ही मुलांकडे पाहून म्हणाला..

“सहा….” तेज आणि आर्वी म्हणाली..

“हो,” नेहा..

तेज मोठा मुलगा,कॉलेज ची नुकतीच चाहूल लागली होती आणि आर्वी अजून शाळेमध्येच पण भलतेच हुशार….

त्याच्यासाठी ही ट्रिप म्हणजे,एखाद्या कहाणीमधील..”एक आटपाट नगर होते…तिथे आम्ही….” अशी काहीशी कथा होणार होती…

सकाळी… सगळे आवरून तयार होतात..

“आर्वी,माझा हेडफोन घेतला का?? आणि हो बॅटरी पण घे,मोबाईल बंद पडायला नको..काही झालं तरी” तेज बहिणीला सांगत होता..

“याची गरजच पडणार नाही” नेहा मनातल्या मनात म्हणाली..

“हो,आई मी माझा टॅब घेते,”आर्वी म्हणाली…

“सगळ्यांना जे हवंय ते घ्या पण त्याच बरोबर ,तुमचे स्वेटर,जरकिन आणि मंकीकॅप पण घ्या आणि छोटे छोटे दोन -तीन ब्लॅंकेट” नेहा म्हणाली….

यश आवरून गाडी आणायला जातो…

सगळे खाली येतात आणि तयार होतात,निघण्यासाठी…

छान एखाद्या फॉरेन टूर ला जसे जातात तसेच अगदी सगळं झालेले असते…. चिप्स,चॉकलेट, स्नॅक्स आणि बरेच काही..

((मुलांना माहीत नव्हतं ,हे खाण्याचं गावाकडच्या लोकांसाठी आहे म्हणून,मुलांसाठी नाही”))

हेडफोन्स,कॅमेरा, बॅटरी बॅकअप आणि अजून बरच काही….

प्रवास चालू झाला…

भव्य अशी सकाळ…शांत सकाळच्या गाण्याच्या मधुर गीते आणि नुकताच सूर्य डोकं वर काढत होता…

सगळे शांत होऊन अनुभवत होते…

“आई ,किती वेगळं आणि छान ,विलक्षण वाटतय ना”तेज म्हणाला..

“मला तर आठवतच नाही,माझी शेवटची एवढी छान  सकाळ मी कधी पहिली होती…गावी गेलो होतो तेव्हा कदाचित..” यश म्हणाला..

” हो ना,मला तर आठवतच नाही… कॉलेजला असताना..ट्रेकिंग ला जायचे तेव्हा कदाचित असेल…” नेहा म्हणाली…

“पण रोज मी जेव्हा उठते तेव्हा तर ऊन नसते ना,अगदी दहा वाजता गॅलरी मध्ये येते पण आज तर लवकरच आला की सूर्य”आर्वी म्हणते…

तसं यश आर्वीच्या डोक्यात टपली मारतो…

पुण्याला मागे सोडत… भोरच्या बाजूला.. बंगलोर हायवे ने कार सुसाट चालली होती…

मंद हवेची झुळूक आणि मधूनच येणारी कोवळी किरणे..

नकळत का होईना ,मनावरची मळभ दूर करत होती…

निसर्ग पाहत होतो ,उघड्या डोळ्यांनी.. स्वच्छ मनाने..

“हायवे सोडून आता ,गाडी आत ओळवली.. रस्त्याची गुणवत्ता पण लगेच बदलली…

गाडी थोडी पुढे गेली आणि जोरात आदळली, खड्डा होता मोठा.. कुठला खड्डा चुकवावा ,हे काही यशला जमत नव्हतं…”

“मम्मा, बाबा जरा हळू”आर्वी ओरडली..

“काय झालं बाबा,ठीक आहे ना तुम्ही”तेज म्हणाला…

“हो,रस्ता खराब आहे” यश म्हणाला..

“कुठे आलोय आपण,आणि बाहेर जाणार होतो ना आपण मस्त औटिंग ला मग हे काय,इथे रस्ते पण नीट नाहीत”तेज म्हणाला…

“हो ना,आई आणि बघ ना सगळे कसे पाहतायेत आपल्याकडे,जंगलात आलोय का आपण” आर्वी म्हणाली..

“हो ,सिमेंट आणि काँक्रीट च्या जंगलातून ,खऱ्याखुऱ्या निसर्गात आलोय आपण”नेहा म्हणाली…

“हम्म, छान आहे,उंच उंच डोंगर आणि ही कधी न पाहिलेली झाडे आणि हा नागमोडी रस्ता” तेज म्हणाला…

“हायवे सोडून अर्धा तास होत आला होता”…

तेज सहज फोनकडे पहातो आणि जोरात ओरडतो..

“ओ… नो…”

“काय झालं,दादया” आर्वी म्हणाली….

“काय होणार तेव्हा,रेंज च नाही”तेज म्हणाला..

“डोंगर आहेत ना म्हणून,येईल गावात गेल्यावर” आर्वी म्हणाली…

“गावात पण रेंज नाही,ह्यांना आताच सांगितलं तर उगीच डोकं खातील,त्यापेक्षा काहीच नको म्हणायला”नेहा मनातल्या मनात म्हणते..

” हम्म ,ते पण आहेच” तेज आर्वीला म्हणतो..

“बाबा,अजून किती वेळ ” आर्वी म्हणते..

“या डोंगराच्या पलीकडे जायचंय आपल्याला ,” नेहा म्हणते..

“काय!!! अग अजून खूप वेळ लागेल मग आणि त्यात हा रस्ता आता माझी चीड चीड होयला लागली आहे बघ,”तेज म्हणाला…

तेवढ्यात गाडी काही केल्या वर चढेना झाली…

टायर अडकला होता खड्यात आणि पुढे उंचच उंच चढ होता…

“काय होतंय” नेहा थोड्या गंभीर स्वरूपात..

“गाडीच पीक अप घेईना झालीये,रेस होईना,क्लच गिअर चा पण वास यायला लागलाय” यश थोडं चिंतेत म्हणाला..

“थांब आम्ही खाली उतरतो आणि मग थोडा धक्का देतो” नेहा म्हणाली..

“ठीक आहे” यश…

सगळे खाली उतरले आणि पाहतायेत तर काय, रस्त्याच्या दोन्ही बाजूने खोल दरी,थोडा हलगर्जीपणा चालणार नव्हता…

सगळ्यांनी मोठा श्वास घेतला आणि गाडीला खड्ड्यातून बाहेर काढलं,खर…

“आई ,मी दोन- तीन फोटो काढते” आर्वी म्हणाली..

यश ने गाडीतून हात दाखवला आणि पुढे जातो थोडं म्हणून सांगितलं….

तेज आणि आर्वी मस्त ,सगळी चीड चीड विसरून ,मस्त फोटो काढत,वेगवेगळ्या पोज देत…आठवणी साठवत होते…

थोडंच पण अगदी थोडंच चालले पण श्वास मात्र आमच्या तिघांचा पण फुलला होता,त्यावरून का होईना पण फुफ्फुसे किती कमकुवत आहेत हे समजलं..

“आई,थोड्या क्षणांसाठी का होईना पण मी घाबरलो होतो बघ,कसले भयानक आहे ना हे,म्हणजे मदतीला कोणीच नाही…कुठे जायचे तर गूगल मॅप पण नाही,कोणाला फोन करायचा तर रेंज नाही.. म्हणजे विलक्षण ना…. आजच्या काळात पण माणूस अस कस राहू शकतो ना,होरीबल च ना” तेज आई ला सांगत होता…

“दादया,नसेल इथे कोणी राहत,आपल्यासारखा फिरायला येत असतील”आर्वी म्हणाली….

“चला,बाबा थांबलाय..”नेहा हसत म्हणाली…

मोबाईल आणि नेट यांच्यापासून का होईना पण स्वतःच आकलनशक्ती आज मुलं पणाला लावतायेत, हे पाहून नेहा मनातल्या मनात खुश होती…

“आता हळू हळूच जाऊयात,अस म्हणत” यश ने बाप्पाच्या पाया पडतो…

अगदी शांततेत डोंगर पार होतो आणि फायनली गावामध्ये एन्ट्री होते तर…

“आई अजून पण रेंज नाही ग” तेज म्हणतो…

“कशाला लागतेय राजा तुला रेंज ,आम्ही आहोत ना सोबत”नेहा म्हणते…

“अग, अपडेट द्यायचेत ना,सोशल साईटला” तेज म्हणाला..

“धन्य, जेव्हा येईल ना तेव्हा दे,” नेहा म्हणते…

“बस वाट बघत,”यश थोडं चिडवतच म्हणाला….

“नेहा, कुठे आहे त्यांचं घर”यश म्हणाला..

“हे समोर मंदिराच्या तिथे चल”नेहा….

मंदिराजवळ सगळे गाडी लावून खाली उतरतात,तेवढ्यात आजूबाजूचे लोक पाहतात त्यांच्याकडे…

“बांदल काका कुठे राहतात” नेहा विचारते..

“हे काय पोरी आलो मीच,खूप चकरा घातल्या पण गाडी काही दिसली नाही म्हणून ,नुकताच घरी गेलो होतो” काका म्हणाले….

“मग फोन करायचा ना ,आजोबा”आर्वी म्हणाली…

आणि आता मुलांना पहिला धक्का बसणार होता…

“आमच्याकडे नाहीत कोणाकडे गावात फोन,रेंज च नाही ना”काका म्हणाले…

तस दोन्ही मुलांनी पाहिले आई आणि बाबा कडे वैतागून पाहिलं….

“तुला माहीत होते आई,”तेज आणि आर्वी म्हणाले….

“तीचाच तर प्लॅन आहे,तुम्हाला एक आटपाट नगराची ओळख करून द्यायची होती ना” यश म्हणला…

“चला,जेवून घेऊयात मग,तुम्हाला खेकडे दाखवतो” काका म्हणाले…

सगळे काका च्या मागे जातात..

नेहा ने गाडीमधून बॅग पण घेतली असते…खाऊची..

“खाली वाकून ये रे पोरा” काका म्हणाले..

घर पाहून तेज आणि आर्वी थोडं शांतच होतात..

“बसू कुठे मी आई”आर्वी म्हणते…

सगळीकडे स्वच्छता मात्र खूप होते पण,सारवलेली शेणामातीची घरे आणि जास्त पाऊस असलेल्या भागामुळे त्याची रचना तशी होती….

सगळं निर्मळ असले तरी सोफ्यावर बसणाऱ्या आर्वीला आणि घरात चप्पल घालणाऱ्या तेज ला हे सगळं नवीनच होते ना….

मुलं शांत झाली होती… आणि प्रश्नांची आता डोक्यात गर्दी झाली होती….

“तुम्हाला काय हवंय ना ,ते विचारा काका ना ,मी काकूंना मदत करते”नेहा सांगून आत जाते..

“तेज आणि आर्वी सगळं भान हरवून,काकांना प्रश्न विचारतात…

आर्वी मधून मधून काका आणि तेज चा व्हिडीओ पण काढत असते….

“किती तरी दिवसातून मुलांना पडलेले एवढे प्रश्न गुगल न देता ,एक व्यक्ती देतेय,हे पाहून यश मनोमन खुश होतो…”

गप्पाची मैफिल रंगलेली असते,आमच्याकडे हे ,तुमच्याकडे ते म्हणत…जेवणाची ताट येतात समोर…

“भाकरी,गरम भात आणि खेकड्याची रस्सा भाजी” एवढंच…

“ताट पाहून तोंड वाकडी होणं साहजिकच,एक तर जाम भूक लागली असते आणि त्यात फक्त एवढंच” तेज आणि आर्वीच्या मनात चालू असते…

थोडं भीत भीतीच आर्वीने भाजीचा एक घास खाल्ला आणि जोरात ओरडली..

“वा,आजी…काय बनवलं आहे, भन्नाट” आर्वी..

“हो ना,खूप सारे मसाले आणि खूप असे सारखे तेच टेस्ट चे जेवण खाऊन नको झाले होते” तेज म्हणाला…

“कोणत्याच रेस्टॉरंट ला मिळणार नाही बघा,अप्रतिम जेवण आहे” यश म्हणाला…

सगळ्यांनी तोंड भरून कौतुक केलं आणि भरभरून जेवले पण….

या सगळ्यात मोबाईलचा कधी विसर पडला तेच समजलं नाही…

काकांसोबत भाताची शेती आणि भाताच्या शेतीतील खेकडे पाहण्याचा आणि त्यांना पकडण्याचा आनंद मात्र मुलांनी मनमुराद लुटला….

दिवस संपत आला होता,सूर्यास्त जवळून पाहत होती ,आर्वी आणि कॅमेरा मध्ये कैद केले होते….

“आम्ही तुमच्यासाठी काही करू शकतो का?? “तेज ने काकांना विचारले..

“नको पोरा,आम्ही ह्या जंगलात आणि शहरापासून च लांब आहोत ते बर आहे, पौष्टिकता जपतोय रे खाण्याची आणि जगण्याची,दीर्घ आयुषी जगतोय”काका म्हणाले..

“खर आहे तुमचं, प्रगतीचे ठिकाण जरी शहर असले ना तरी खऱ्या आयुष्याचे ठिकाण मात्र पाडच म्हणालायला लागलं”नेहा म्हणाली…

खूप साऱ्या आठवणी मनात घेऊन,त्यांनी तो पाडा सोडला आणि मनात अस पण असू शकते म्हणत,सगळेच शांत होते….

“जाताना जेवढा वेळ लागला तेव्हढा येताना नाही लागला ना,बाबा” आर्वी म्हणाली..

“हो ना,तू रमली ना त्या आठवणी मध्ये म्हणून”तेज म्हणाला..

“रोज नाही बाबा,पण कधी तरी ठीक आहे….तिथे जाणं”आर्वी म्हणाली…

“हो ना ,यार नो नेटवर्क आणि नो फोन ” तेज म्हणाला…

“तुम्हाला तर चेंज हवा होता ना,बदल म्हणून म्हणल ” नेहा म्हणाली…

यश पण हसला…

तेवढ्यात फोन वाजला…

“आलं म्हणायचं पुणं जवळ” नेहा म्हणाली…

“तुला काय सांगू ब्रो,आज आम्ही ,एका आटपाट नगरात आलो होतो,तिथे फोनच कोणी वापरात नाही …..” तेज च्या फोनवर गप्पा चालू झाल्या….

मुलाच्या अनूभवावरून नेहा खुश होती आणि यश पण…..

Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: