प्रेरणा …( लघुकथा )
प्रेरणा…
“सुरवात करायची म्हणलं की सगळ्यांना नवीन वर्ष जरा जास्तच भारी वाटत.म्हणजे जून वर्ष पण नव्या सारखच असते पण त्याच नवं पण गेलं की आपले संकल्प पण नव्याचे नऊ दिवस म्हणून मागे राहतात.
तसा खोलात विचार केला तर,उगवत्या सुर्या पेक्षा नवीन आयुष्यात काय असणार ,अंधार पडल्या नंतर ,सगळ्या दिवसाच्या आठवणी विसरून नकळत का होईना आपण म्हणतोच की उद्याचा दिवस नवीन काहीतरी घेऊन येईल म्हणून, नवीन काम करणाऱ्याला नवीन वर्षाची किंवा नवीन दिवसाची गरज नसते ,असते ती फक्त आणि फक्त स्वतःची मनाची नवीन काही तरी करण्याची इच्छा….”
“बाबा, मला ना स्वतःच्या पायावर उभा राहायचं आहे ,स्वतःच अस्तित्व निर्माण करायचा आहे ,आताच लग्न नकोय मला” प्रेरणा म्हणते.
“काय शिकून करणार ग,माझा जीव कधी जाईल सांगता येणार नाही,माझं डोळे मिटायच्या आत मला तुझं लग्न पाहायचं आहे”आजोबा म्हणाले.
“तुम्ही दोघे शांत व्हा,अजून किती दिवस लागतील तुझ्या शिक्षणाला ,तसं स्थळ पाहूयात आणि लग्न झाले ना तरी आपण शिकवण्याची अट त्यांना घालूयात,म्हणजे तुझं शिक्षण पण पूर्ण होईल आणि मिळालं तर चांगलं स्थळ पण पाहुयात,” बाबा लेकीला आणि वडिलांना समजावून सांगत होते.
पुढे चालत जातात आणि आजोबांजवळ जाऊन ,चेष्टेने आणि थोडं डीवचतच म्हणतात,”एकदा तुझं लग्न झालं की हे पण डोळे मिटवायला मोकळे आणि तू पण जायला मोकळी पण घरात कुठे खरी शांतता मिळेल मला” बाबा हसत म्हणतात.
नाही म्हणता म्हणता दिवस पुढे जात होते, बाबांनी प्रेरणाच्या लग्नाचं चांगलंच मनावर घेतलं होतं,आणि चांगल्यातील चांगलं घराणं आणि चांगला मुलगा शोधून काढायचा चंगच बांधला होता.
आजोबा आणि प्रेरणा म्हणजे आजोबा आणि नातं यांच्यातील परिपूर्ण नात होते,आजोबांनी तिच्यावर तेवढाच जीव लावला होता त्यामुळे त्यांना प्रेरणाच लग्न म्हणजे त्यांची शेवटची इच्छा वाटत होती.त्यामुळे लग्नाला धरून सारखं घरात चालूच होते,लग्न करायचं म्हणल्यावर स्वयंपाक तर यायला पाहिजे ना, एकवेळ बाकी काही नाही आले तरी चालेल पण थोडं फ़ार तरी कमीत कमी चहा,पोहे तरी, भाकरीला पाणी कुठल्या बाजूने लावायचं हे तरी माहीत पाहीजेच ना…..
“अग, प्रेरणा थोडं स्वयंपाक पण शिक जरा,नुसता अभ्यास करून करून काय होणार आहे,किती ही मोठी कलेक्टर झाली ना तरी स्वयंपाक तुला आलाच पाहिजे” आजोबा प्रेरणाला म्हणतात.
“अहो आजोबा,स्वयंपाक करायला मी बाई लावेल,मला आता शिकू द्या” प्रेरणा आजोबांना म्हणते.
आजोबांनी सांगितलं तर प्रेरणाला पटत नव्हतं,शिक्षणाच्या वेडी मुलीला घर संसारातील काय आवड असणार पण स्वयंपाक तर शिकावं लागणारच ना,म्हणजे समजा मध्येच शिक्षण पूर्ण न होता जर लग्न झाले तर शिक्षण आणि संसार यांचा भार पेलावा लागणार ना तिलाच,यात जर किचन मध्ये काही माहीत नसेल तर मग काय होणार… आणि प्रेमाचा मार्ग पोटातुन जातो ना!!
“अग, एक चांगला स्थळं आलाय,आवडलं सगळं तर हो म्हणून टाकूयात ,उद्या पाहुणे पाहायला येतील मग बघुयात” बाबा घरातील सगळ्यांना सांगत होते.
ठरल्या प्रमाणे सगळं सुरळीत पार पडलं आणि मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा पसंद पडला आणि लगीन घाई आता जवळ आली होती,सगळी खरेदी अगदी जोरात चालू होती आणि प्रेरणा चा अभ्यास पण.
प्रेरणाला सासर तस गावाकडचेच मिळालं होतं म्हणजे आजोबा म्हणल्यासारखं तिला स्वयंपाक हा शिकलाच पाहिजे होता.
“थोडं फार तरी शिक ग पोरी स्वयंपाक नाहीतर बापाला घेऊन जा सोबत तुझ्या तिथे ,तो करेल स्वयंपाक” आजोबा सारख प्रेरणाच्या मागे लागायचे.
“नका काळजी करू आजोबा,आमचे केमिस्ट्री चे सर म्हणतात की ज्याला चांगली केमिस्ट्री जमते ना त्याला स्वयंपाक उत्तम येतो,आणि माझी केमिस्ट्री तर खूप छान आहे,त्यामुळे तर मग काहि काळजीच नाही… तुम्हाला घेऊन जाते ना सोबत माझ्या” प्रेरणाने आजोबांना घट्ट मिठी मारत म्हणाली.
लग्न झालंच… दिवस हा हा संपले आणि प्रेरणाने फक्त चहा आणि शिरा याच्यापुढे काही स्वयंपाक केलाच नाही….
“नवीन नवरी ना,तुझ्या हातचं काही तरी छान कर गोड धोड” नवरदेवाच्या मामी म्हणाली.
“चहा करू का??” प्रेरणा…
“खायला ग आणि देवाला नेवेद्य पण”सासू म्हणाल्या.
“ठीक आहे,शिरा आणि चहा करते,”खूप जोशात प्रेरणा म्हणते. बऱ्यापैकी छान झाला होता शिरा. पण आता जेवणाचं काय…
“प्रेरणा,आजपासून माझं किचन तुझं,तुझ्या नवीन नवीन रेसिपीने त्याला खुश कर” सासू प्रेरणाला म्हणाल्या.
“हो ” प्रेरणा नाराजीच्या सुरातच म्हणाली. आता काय करायचं,मला तर काही येतच नाही, आईला भाजी आणि चपाती करताना पाहिलं होते तसेच करूयात. तस स्वयंपाक करण थोडीना अवघड आहे नाहीतर सगळ्या बायकांनी केलाच नसता ना.
प्रेरणाला स्वयंपाक मधील जास्त काही माहीत नव्हतं आणि तिला स्वयंपाक म्हणजे अगदी किरकोळ गोष्ट वाटत होती,दिवस सकाळी साडेसात वाजल्यापासून ती कॉलेजला जायची आणि घरी सगळे क्लासेस संपल्यावर संध्याकाळी घरी आणि दिवसभर एवढी दगदग होयची की घरी आल्यावर काय शिकणार स्वयंपाक आणि अजून ती कॉलेजला जातच होती ना,त्यामुळे अभ्यास करता करता स्वयंपाक शिकायला वेळच मिळत नव्हता,रविवार भेटायचा तर आईच्या हातचं स्पेशल खाऊ वाटायचं आणि मस्त टीव्ही. मग तुम्हीच सांगा प्रेरणा सारख्या सगळ्याच मुलींना स्वयंपाक जमेल कसा ते पण लगेच लग्न झाल्या झाल्या……….
“प्रेरणा,तुला जे आवडतंय ना ते कर,अगदी बिनधास्त कर,तुझी आई एवढा चांगला स्वयंपाक करते म्हणल्यावर तर तुला पण नक्कीच येत असेल” सासरे म्हणाले आणि ते ही सगळ्यांसमोर. तसे आता पाहुणे कोणी नव्हते राहिले,झाले ना नव्याचे नऊ दिवस, आठवडा झाला होता लग्नाला म्हणल्यावर स्वयंपाक तर यायलाच पाहिजे ना.
“म्हणजे ,हो” प्रेरणा काही म्हणायच्या आत सासरे निघून पण गेले. आता त्यांना सांगू काय की मला काहिच येत नाही म्हणून. तसा स्वयंपाक काय अवघड आहे म्हणा,मी केमिस्ट्री ची टॉपर आहे म्हणल्यावर आणि पुढच्या आठवड्यात तर परत कॉलेज आहे म्हणल्यावर जावं लागेल आणि तस आईला पाहिलं आहे ना जेवण बनवताना थोडं थोडं माहीत आहे तसेच बनवते.
प्रेरणाने अगदी मनापासून स्वयंपाक केला सगळ्यांसाठी आलू मटार आणि छान चपाती. करताना तिने प्रॅक्टिकल समजूनच केलं म्हणजे तिला रिझल्ट ची चिंता होतीच.
“प्रेरणा ,ताट करायला घे,मी आलेच ” सासू म्हणल्या.
“हो,प्रेरणा ताट करायला घेते आणि पाहते तर काय भाजी मधील तेल बाजूला केलं तर डायरेक्ट तळ दिसत होता तिला ,आणि चपाती तुटता तुटत नव्हती” प्रेरणा तशीच उभी राहिली.
“मी कधी स्वयंपाक केला नाही म्हणजे मला वाटलं नव्हतं की लगेच माझं लग्न होईल आणि जेवण बनवायला यायलाच पाहिजे,माझ्या कॉलेज मुळे मला वेळ ही भेटला नाही तसं शिकायला,आणि माझे आजोबा सारखे म्हणायचे की स्वयंपाक शिक म्हणून पण मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नाही दिले आणि अस पण मी बरेच दिवस होस्टेलला असल्यामुळे किचन मधील मला खरच काही ज्ञान नाही,पण मी शिकेलं” प्रेरणा अगदी मोकळ्या अंतःकरणाने सगळं बोलून गेली.
“मी आहे ना,मी शिकवेल तुला,” सासू ने आधार देत म्हणाल्या.
“एकच आठवडा आहे परत आपण नाशिक ला गेल्यावर काय रोज हॉटेल मध्ये खाणार का??” नवरा हसत म्हणाला.
प्रेरणा आणि घरातीळ सगळे हसले आणि तिने बनवलेला स्वयंपाक ही चावता येत नव्हता तरी खाऊन घेतला.
“आई, मला समजतच नाही ग,माझी भाजी कशी बिघडली ते आणि तुला पाहिले होते ना तशाच चपाती बनवायचं प्रयत्न केला होता,दिसायला छान गोल होत्या पण थंड झाल्या की तुटेना झाल्या ग” प्रेरणा आईला फोन करून सांगते.
“सगळ्यांच तसच होते ग,सुरवातीला” आई म्हणाली.
“पण,मी आता ठरवलंय बेस्ट कुक होयच म्हणून,हीच माझी आता नवीन सुरवात,नीट लक्ष देऊन आणि गूगल ला सोबत घेऊन,एक दिवस नक्की मी चांगली सुगरण होणार ते”प्रेरणा ने आईला अगदी विश्वासाने सांगितलं.
प्रेरणाच्या नवीन प्रवासाची सुरवात झाली,अगदी वयाच्या पंचविसाव्या वर्षी सुगरण होण्याचा प्रवास, त्या प्रवासात तिची सगळ्यांनी साथ दिली आणि सगळ्यात साथ दिली ती तिच्या पतीदेवाने ,काहीही झालं ,कसंही झालं तरी त्यांनी खाणं सोडलं नाही ,गोड बोलून चुकाही समजावल्या आणि प्रगती पण दाखवली.
शेवटी प्रेरणा आता केमिस्ट्री च्या लॅब मध्ये बसून जॉब न करता,एक मोठया यु ट्यूब फूडचा चॅनेल चालवते आहे आणि स्वयंपाकाला केमिस्ट्री मानणारी प्रेरणा किचन मध्ये रोज वेगळे प्रयोग करत आहे आणि त्याला छान छान नाव पण देत आहे.