मी मोनिका भाग #९
भाग # 9
भावड्याने आता जास्त वेळ घरी राहनच पसंद केलं होतं…
आई गेल्यानंतर मोनि दोन दिवस उपाशी होती आणि एकाच जागेवर…
अथांग प्रयत्नानंतर तिला बाहेर काढल होते..
मोनिची अशी अवस्था पाहून,भावड्या आणि छाया ने गावीच राहायला येण्याचा निर्णय घेतला आणि घरची शेती करायची अस ठरवलं…
मोनिसोबत राहता पण येईल जास्त वेळ आणि लक्ष पण देता येईल..
भावड्याला हे चांगल समजलं होते आता ,की तिच्या मनातील मरणाची भीती काढून टाकायची म्हणून…
भावड्याने तिच्याशी बोलण्याचं टाळलं आणि तिला पिक्चर दाखवू लागला..
मोनि आता टीव्ही पाहू लागली होती,टीव्ही च्या कलाकार म्हणजे तिचे स्वतःच अस्तित्व झालं होतं..
घरातील झाडून,कुठे भांडी उचलायची पण त्याच्याशिवाय तिला मात्र अजून काहीच आले नाही..
ज्यावेळी पण तिला आजी ची आठवण येयची तेव्हा मात्र तिला असह्य होयच,जिथं आजीचं दहन केले होते ,तिथं जाऊन मोनि बसत असायची…
“माझ्या पोरीला मी च अजून जवळचा वाटेना”भावड्या नानांना म्हणला…
“तस नाही रे,बाप काय परका असतो का, लेकीच्या जातील” नाना.
“आई ,होती म्हणून काळजी वाटत नव्हती,मोनि निदान तिच्या आजीसोबत खेळायची तरी”भावड्या.
“नको काळजी करू,मोनि समंजस आहे ,सगळं निभावून घेऊन जाईल बघ” नाना.
“देवाला च काळजी तिची” भावड्या.
भावड्या आता घरीच शेती करत होता म्हणून त्याला जास्त वेळ मिळत होता मोनि साठी…
दिवसामागून दिवस जात होते,नव्याने मोबाइल नावच पर्व चालू झाल होते..
मोनि ला बोलायला येत नसायचं पण मोठ्या हौशीने बोलायची फोन वर कधी तिच्या आत्यासोबत तर कधी काका सोबत ,तर कधी चुलत बहिणी आणि भावंडांसोबत….
आता मोनिच्या छोट्या भावाच लग्न करण्याची वेळ आली होती..
तसा तो नेहमीच बाहेर शिकलेला आणि बाहेरच वाढलेला..
घरी फारच कमी वेळ…
बहिणीबद्दल माया आणि प्रेम ,आपुलकी मात्र भरून वाहणारीच…
त्याला स्थळ येत होती,पण पाहुणे घरी येऊन गेले की परत काही येण्याचं नाव नाही…
मोनिला त्या नजरा खाऊ का गिळू करत होत्या…
सुरवातीला मोनिला भारी हौस वाटायची,नवीन पाहुणे येणार,आपल्या घरी नवीन नवरी येणार..
“काय झालं” छाया.
“काही नाही,” भावड्या.
“त्यांना मुलगा तर पसंद होता ना ,मग” छाया.
“त्याला कोण नाकारणार आहे पण मोनि म्हणलं की लोक विचार करतात ग” भावड्या जड अंतःकरणाने म्हणाला.
“मग काय टाकून देयची का तिला?? का सोडून येयचे तिला कुठे”?? आखरीतच झालं लोकांचं पण” छाया रागाने म्हणाली.
“विचार तर करणारच ग “भावड्या.
“हम्म” छाया.
“सगळं कळतंय बघ मला,आपला पोरागच एवढा शिकलेला आहे म्हणल्यावर सून पण शिकलेली च येणार घरात,त्यामुळे होत असेल थोडं इकडे तिकडे”भावड्या.
” हा,पटतंय मला” छाया.
“पण ,मोनिला स्वीकारणारी सून मिळाली तरच लग्न करायचं नाही तर बघू पुढच्या पुढं” भावड्या म्हणाला…
तेवढ्यात मोनि आतल्या खोलीतून बाहेर आली आणि भावड्याच्या गळ्यात पडली..
भावड्याने तिला जवळ घेतलं आणि पाठीवरून हात फिरवला….
मोनिच्या डोळ्यात त्याने आज,शांतता पहिली होती,आपलेपण पाहिलं होते..
मोनि खुश होऊन परत बाहेर जाते…
“बर झालं,तुम्हाला चाहूल लागली मोनिची ,नाहीतर बोलायच्या नादात काही तरी बोलून गेलो असतो आणि नको ते उद्योग झाला असता” छाया भावड्याला आधार देत म्हणाली.
मोनिच्या मनात पण विचार येतच असायचे,आपल्यामुळे आपल्या भावाचं लग्न होत नाही…
तिच्या एकलकोंडी मनाने समजलं होते आणि जाणलं पण होते..
जेव्हा जेव्हा पाहुणे येण्याची वेळ होयची तेव्हा मोनि कोणाला न सांगताच निघून जायची,कधी नाना च्या घरी तर कधी ,झाडाखाली तर कधी चुलत्याकडे….
पाहुण्यांपासून लपवण्यासारखी तर गोष्ट नव्हतीच मुळी…..
हो ,नाही करत एक स्थळ जमलं..
पण त्यांना जास्त विश्वास होता ते,लग्न झाल्यावर कुठे आपल्या मुलीला इथे राहायचं आहे, नवरा मुलगा,चांगला शिकलेला आहे म्हणल्यावर…जाईल त्यांच्यासोबतच….
शेवटी लग्न जमल तर,लगीन घाई चालू झाली….
कपडे, बस्ता अगदी भरभरून सगळं चालू होते..
घरात नवीन कार्य म्हणल्यावर सगळ्यांची घोडदौड चालूच होती…
मोनि पण मनापासून सगळं निवांत एकाबाजूला बसून पाहत होती आणि आनंद पण घेत होती…
सगळं सुरळीत चालू होते..
“तुला काय बांगड्या भरायच्या आहेत ना,तेव्हढ्या सगळ्या भर ताई” दादा म्हणला ,म्हणजे मोनिचा छोटा भाऊ…
“आ…आ…”म्हणत मोनिने मान हलवत त्याला हसत म्हणाली..
बांगड्याची हौस तिला अगदी पहिल्यापासूनच..
जेवढ्या हातात बसतात तेवढ्या बांगड्या तिने भरल्या अगदी हशी-खुशी…
बांगड्या घालून मोनि मात्र सगळीकडे मिरवू लागली होती,मजेत होती…
ती खुश तर सगळं घर खुश,मजा तिच्याशिवाय नव्हतीच खर कशाला…
लग्न चांगल्या थाटात झालं..
आलेल्या नवरीला निरखून पाहण्यात जी मजा येत होती ना ते मोनिनेच अनुभवली…
कृती वहिनीला काही मोनिने सोडलं नाही.. सारखं मागे मागे..
तिच्याकडे पाहून फक्त हसायची.. मान हलवायची…
“काय मग मोनाबाई आवडली का वहिनी”भावड्या मजेतच म्हणाला.
सून घरी आल्यावर आपल्या लेकीच्या चेहऱ्यावर हसू मात्र कायम राहिला पाहिजे,हे प्रत्येकच बापच स्वप्न असते…
आपल्या मागे आपल्या पोरी कधी परक्या नाही झाल्या पाहिजेत..
आणि प्रत्येकाला एक तरी मुलगा असावाच,स्वतःच्या मुलीला भाऊ म्हणून आधार देणारा..
आणि बहिणीच्या जगण्याला भावाचं प्रेम हवंच….