मी मोनिका भाग # ११

भाग# 11

सतेज गेला ते परत कधी न येण्यासाठीच…

कृती ने त्याला चांगलं रोजच भरीस पाडल होते… अपंग मुलीच्या सोबत राहून आपली पण मुलगी अपंग होण्याचं…

अपंग संसर्गजन्य असता तर माणूस माणसात राहिला नसता…

हे असंच काहीसं झालं होतं….

सतेज कधी तर यायचा सणाला परत ते दुसऱ्या वर्षीच्या सणालाच…

आता तुलसी  मोठी झाली होती… दोन वर्षांची होत आली होती…

तुलसी मोनि आत्या सोबतच वाढली होती ,हे पण ती विसरुन गेली होती….

तुलासीचा झालेला विरह आणि वाढत चाललेला एकांत मोनिला आतून पोखरत होता..

मोनि च वय आता जवळ जवळ चाळीशीच्या दारात आले होते..

इकडे तिकडे लांब फिरणं आता बंद झालं होतं.. वजन ही वाढलं होते..

वजन वाढलं की तिला तिचाच भार झेपत नसायचा, मग पायाला शरीराचा भार नाही झेपला की मोनि खाली पडायची.. मग जखमा होयचा आणि परत त्रास तिलाच होयचा…

“वजनाने होतंय का तिला हे सगळं”भावड्या छाया ला म्हणाला..

“हो ,वजन झेपेना तिच्या पायाला”छाया म्हणाली…

“मग आता काय करायचं”भावड्या..

“तीच जेवण कमी करून तीच वजन कमी कराव लागेल” छाया जड अंतःकरणाने म्हणाली…

“पण कस ग”भावड्या..

भावड्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं…

“काय दिवस दाखवतोय देवा,पोटच्या पोरीला जाणूनबुजून उपाशी ठेवायच ते पण भरलं घर असताना”भावड्या मनातल्या मनात म्हणतच डोळ्याचं पाणी पुसत होता…

छायाने तिचा आहार कमी केला…

मोनि अजून जेवायला दे म्हणून जोरजोरात भांडी आपटायची.. गोंधळ घालायची….

खायला कमी पडल्यामुळे आणि चालणं होत नसल्यामुळे…मोनिला जीव नको वाटायचं…

दिवस दिवस ,झोपून राहायची…टीव्ही बघत पडून राहायची…

भावड्याला तिची ही अवस्था पाहू वाटत नसायची…

त्याला याचा खूप त्रास होयला लागला होता..

“सतेज,कधी येतोय तू ,मला बर वाटत नाही रे,माझ्या छातीत पण दुखतंय बघ,ताई च जेवण पण कमी केलय ,बघू वाटेना झालंय, तू ये लवकर” भावड्या सतेज सोबत फोन वर बोलत होता…

“येतो, नका काळजी करू तुम्ही”सतेज..

“कधी येणार पण अस म्हणत म्हणत आता दोन वर्षे होत आली की रे”भावड्या….

“लवकरच येतो,ठेवू का मला काम आहे” सतेज..

“ठेव काळजी घे,पण आम्ही वाट पाहतोय” भावड्या…

फोन ठेवल्यावर भावड्या अजूनच तुटून गेला होता…

रोज मोनिच्या विचाराने खंगला होता… त्याची तब्येत पण खराब होत चालली होती…

“तुला एवढा त्रास होतोय तर तू दवाखान्यात का नाही जात”रवी .

“दादा आला की जाईल त्याच्यासोबत” भावड्या..

“माझ्यासोबत चल मी येतो”रवी..

“नको,मी त्याच्यासोबतच जाणार” भावड्या..

“नको हट्ट करू,येईल तो पण तोपर्यन्त तर,मोनिकडे पाहून तरी चल” रवी…

“नाही येणार,मी आजारी आहे म्हणल्यावर तरी तो येईल ना लवकर” भावड्या म्हणाला…

रवी त्याच्या डोळ्यातच पाहत बसला…

दिवसामागून दिवस जात होते…. सतेज ची डोळ्यात तेल घालून भावड्या वाट पाहत होता…मोनिला पण तुलसी ची आठवण येत होती…

तो दिवस वाईट रूप घेऊनच आला होता…..

“काय होतंय तुम्हाला”छाया…

“काही नाही,मला खीर खाऊ वाटतेय ग” भावड्या…

“अहो ,आता किती वेळ झालं जेवण करून आणि लगेच आता खीर, थांबा आता मला कपडे धुवायचे आहेत” छाया म्हणाली..

“कर की अग, खाऊ वाटतेय मला”भावड्या शांततेने म्हणाला…

आज त्याचा आवाज शांत आणि थकला होता…

“पाच मिनिटं तरी थांबा ” छाया…

“बर,मी मोनिला बाहेर आणतो…” अस म्हणून भावड्या मोनिकडे गेला….

मोनि टीव्ही पाहत झोपून गेली होती..

“ताई चल ऊठ ,आई खीर करतेय आपण दोघे खावूयात नाहीतर मीच करतो”भावड्या ताईला उठवून म्हणाला..

तशी मोनि पण मान हलवत हलवत त्याच्या हाताला धरून बाहेर आली..

मोनिला खाली बसवून किचनकडे जाण्यासाठी निघाला,तेवढ्यात भावड्या वरून खाली कोसळला..

आणि डोकं मोनिच्या मांडीवर पडलं…

उंच असा डोंगर, ऊन पाऊस झेलून पण त्याच अस्तित्व अगदी टिकवून ठेवतो पण कधीतरी निसर्गाचा प्रकोप होतो आणि एवढा मोठा डोंगर जमीन दोस्त होऊन,निसर्गाच्या कुशीत कायमचा निजतो… तस काहीच भावड्याचं झालं होते…

“आ….. आ…. ये…..” मोनि जिवाच्या अंतकरणाने ओरडली आणि जोरजोरात रडू लागली….

“काय झालं”असं म्हणत छाया पळत आली..

“भावड्याला मोनिच्या मांडीवर पाहून हदरलीच ती,अहो…. म्हणून छाया ने हंबरडा फोडला…

छाया ने गंभीर पणे भावड्याला तिच्या मांडीवर घेतलं आणि त्याच्या छाती,हात-पाय चोळायला लागली….

घामाने दरदरून गेली होती छाया..

“मोने वाटीत पाणी आण” छाया मोनिला घाबरतच म्हणाली….

मोनि उठू लागली पण तिला उठायलाच येत नव्हतं..

मोनि घाबरली होती,पूर्ण हादरली होती…

तशीच फरफटत तिने पाणी घेतलं.. खालीच ठेवले होते हंड्यात पाणी, तिने घेतलं..

आणि घेऊन आली..

“अहो उठा,पाणी प्या” छाया…

भावड्याने डोळे पांढरे केले होते… तोंडाचा आकार बदलला होता… त्याला बोलता येत नव्हते…

त्याची वाचा गेली होती…

डोळ्याच्या बुबळ्यात फक्त मोनि दिसत होती…

भावड्याच्या श्वास थांबला होता… 

न दिसणाऱ्या अनंतात विलीन झाला होता…

त्याच्या आत्म्याने शरीर सोडलं होते..

भावड्या सोडून गेला..भरभरून मोनिला डोळ्यात साठवून..

जग सोडून गेला,कायमचा….

एकाच आरडाओरडा झाला होता….

सगळीकडे गोंधळ होता…

कोणालाच विश्वास बसत नव्हता..

कोणीच जवळ नव्हते….सतेज आणि कृतीला बोलावून घेण्यात आल…

मोनि ने भावड्याच्या गालावर जोरजोरात मारायला सुरुवात केली…त्याला उठवत होती पण तो काही उठायचं नाव घेत नव्हता….

मोनिच जगच संपलं होते…

सगळ्यांच्या तोंडात एकच होते,मोनिसाठी तरी त्याने जगायचं होते….

मोनि डोक्याशेजारीच बसून होती…अजिबात कुठेही गेली नाही….

“दादा ,दादा म्हणून सगळ्यांचा आवाज आला…मोनि पडत धरपडत दादा जवळ गेली…

“आ…आ…म्हणत दादाला हातवारे करून भावड्याला उठवायला सांगत होती…”

मोनि मनापासून सांगत होती आणि त्याच्या गालावर हात फिरवत होती…

मोनि अजून भावड्याला जिवंत करण्याचा प्रयत्न करत होती पण …. 

मोनिच्या असह्य प्रयत्नानंतर मात्र मोनिला चक्कर येऊन पडली….

मोनिला डॉक्टर बोलावून सलाईन लावली…

पण…

“हिला शुद्धीवर यायला थोडा वेळ लागेल किंवा चार -पाच तास पण तिच्या मनावर खोल धक्का लागलाय” डॉक्टर म्हणाले..

“ठीक आहे”रवी…

“आता काय करायचं ” रवी म्हणाला…

तेथिलच मोठ्या लोकांच्या सोबत बोलून शेवटी…

मोनि बेशुद्ध असतानाच अग्नी देण्याचा निर्णय घेतला….

दादा ने अग्नी दिला….

देहरुपी राहिलेला भावड्या पण अनंतात विलिन झाला…

मोनिला जाग आली होती तेव्हा काहीच राहील नव्हतं..फक्त तापत्या विस्तावाच्या लाटा होत्या… आणि त्यात पडलेला तिचा बाप….

मोनि तिथेच शेजारी बसून राहिली…

“मोना,घरी चल आता,अंधार पडायला लागलाय” रवी तिला घेयला आला होता…

मोना ने मान खाली घातली होती ,ते वर काढलीच नाही….

शेवटी….

“त्याला पण नव्हतं जायचं ग तुला अस सोडून पण जावं लागलं,जेव्हा देवाचं बोलावणं येत ना ,तेव्हा सगळ्यांनाच जावं लागत,रवी मोनिला समजावून सांगत होता…

मोनि त्याला हाताने खुणावत सांगत होती..

“मग मला का घेऊन जात नाही देव त्याच्या घरी” मोनि आ..आ.. करून पटवून देण्याचा प्रयत्न करत होती…

“जन्म आणि मृत्यू ह्या निसर्गाच्या ठरलेल्या दोन गोष्टी आहेत ग,त्याच्यात कोणीच हस्तक्षेप करू शकत नाही”रवी बोलत होता…

“तू घरी चल, उद्या सकाळी भेट इथे बसून तुझं मन मोकळं कर”मोनाला रवी ने कसतरी समजावून घरी घेऊन आला..

घरी सगळी पाहुणे होती..सगळ्यांच्या चेहऱ्यावर मोनिची काळजी होती..

“पोरीचं कस होयच आता,परकी झाली पोर”

“देवाने आई -बाबा पेक्षा आयुष्य नव्हतं देयचे हिला,उगीच कुत्र हाल नाही काढायचं” 

“काय ,लिहून ठेवलय ,तिच्या आयुष्यात काय माहिती आता”

“किती केलं तरी बाप तो बाप च,लग्न झाल्यावर भाऊ तरी कुठे राहतो बहिणीचा..”

हे सगळं मोनिच्या कानावर पडत होते आणि मोनि याच विचारात स्वतःला परकं समजत ,स्वतःच्या आई कडे पाहत ,विचारात गढून गेली….

Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: