कष्टातलं सुखं
“आज मी खुश आहे,आज कुठं आराम मिळाला, आज मी सुखी झाले” सुषमा ताई म्हणत होत्या…
“अशा अवस्थेमध्ये त्या ,अस का म्हणल्या असतील…. म्हणजे आयुष्याने त्यांना एवढं ओझं दिल होते का?? आज मरणशय्येवर असताना,त्यांच्या चेहऱ्यावरच हसू,जणू पहिल्यांदा त्या एवढ्या खुश होत्या….. “
मनात प्रश्नाचे काहूर माजलं होते….
प्रिया खरं तर त्यांना भेटायला गेली,होती…दवाखान्याच्या पायऱ्या चढताना ही,तिच्या मनात हाच विचार होता की, त्यांना कधी मरण येईल हे सांगता येत नाही… एवढं आयुष्य कस रुसल असं…
“आणि जेव्हा त्यांना भेटले तेव्हा समजलं आयुष्य किती वर्षाचे असावं त्यापेक्षा ते कसं जगावं…. आणि खरंच आहे ते…. फक्त कष्ट वाट्याला घेतलेल्या त्यांना,आज हॉस्पिटलमधील आय.सी.यु चा बेड पण आरामाचे ठिकाण वाटत होते….
स्वप्न पूर्ण करायला जिद्द लागते… मेहनत घ्यावी लागते… मग सगळं त्यासाठी सगळं आयुष्य वेचायला लागलं तरी चालेल का?????…
नेमकं काय…..
समाधान !!!!
जे आनंद साजरा करण्यापेक्षा,कष्ट करण्यात वाटत होते का???
आता मला खरंच अस,वाटत होते की त्याना या क्षणाला कसं वाटतय,याच उत्तर जाणून घ्यावं,त्यांना नेमकं काय म्हणणं आहे… कदाचित जीवन … आयुष्य म्हणजे नेमकं काय,हे त्याचं अगदी योग्य ते सांगू शकतील….
“प्रिया…. प्रिया….”सतीश हलवून जागा करत होता…
“ह…ह…”थोडं भानावर येतंच..
“अग, काय आपण भेटायला आलोय ना…. मग …कुठल्या विचारात हरवून गेलीस… जा वेळ घालावं त्यांच्या सोबत…. ” सतीश म्हणला.. म्हणजे प्रियाचा नवरा…
“हो… पण ना माझी हिंमत नाही बघ…. ” प्रिया…
“वेडी…जा त्यांना बर वाटेल… ” सतीश..
“हो…..”प्रिया
“पण काय ग… तुला त्यांच्या बद्दल काय माहिती आहे अजून,की तू एवढी भावुक झालीस…”सतीश ने तिला। विचारलं….
“त्या थोडं च बोलल्या,आपण परत संध्याकाळी येवुयात….आणि हो,वाटेत सांगते तुला…”प्रिया म्हणाली…
“चल मग,” बाहेरूनच भरल्या डोळ्यांनी हात केला… आणि ते दोघे निघून गेल्या…
दोघे ही शांत होते…
प्रिया आता बोलत होती…
“म्हणजे माझं आणि त्याच खास अस काही नात नाही… मी जेव्हा पहिल्यांदा जॉब करत होते ना… तेव्हा माझी कलीग होती… अर्चना थोरवे… तिची ही सासू….
आम्ही सगळ्याच जणी तिच्या घरी,गेलो होतो…. आम्हला,वाटलं होते की सासू सारखी खूप कडक असेल… पण तसं काहीच नव्हतं…
सख्ख्या आईला,पण लाजवेल अशा आहेत त्या….
त्यांना अधिक जाणून घेण्यासाठी, मी त्याच्यासोबत गप्पा मारायला बसले…
त्यांच्या विषयी ऐकून घेत होते…
पण ना सगळा प्रवास सांगताना मात्र,त्यांच्या चेहरयावर च स्मित हास्य मात्र कायम होते…
“तुम्ही आधी पासूनच शिक्षिका का???” न राहवून मी विचारले….
कारण त्यावेळी मुली आणि ते नोकरी म्हणजे पर्वणीच….
“छे ग… लग्न झालं तेव्हा मी दहावीतच होते…. त्यावेळी लवकर लग्न होयची ना… लग्न झालं आणि दहावीचा निकाल पण आला….
लग्न नवीन होते,माणस नवीन होती…. पण जिद्द तीच होती…
आणि हो ह्यांनी म्हणजे भाऊंनी.. आमच्या ह्यांना सगळे भाऊंच म्हणतात…
भाऊंनी साथ दिली….
साथ म्हणजे,फक्त “हो” म्हणले….
मग काय… चालू झाले तो प्रवास….
घरातील सगळी काम आपटून… गुराढोरांचे सगळं खायला- प्यायला काढून…. धारा…शेण … झाडलोट.. अगदी सगळं.. आपटून….
दुपारचे सासू-सासऱ्याचे जेवण झाकून…
मग घरातून पाय बाहेर टाकायचा…
आणि धावत-पळत जात… ती पहिली लाल परी पकडायची आणि कॉलेज गाठायचं….
सकाळी लवकर उठल्यामुळे.. त्राण च राहायचा नाही…
कधी कधी कॉलेज मध्येच डुलकी लागायची….
कस-बस कॉलेज करायचं आणि लाल परिमध्ये भेटलीच चुकून जागा… तर मग अभ्यास करायचा…
घरी गेल्यावर पुन्हा…. घर झाडलोट.. गुर ढोर… सगळा व्याप आवरून… स्वयंपाक आणि रात्रीची भांडी…
सगळं करता करता…. कधी झोप लागायची तेच कळायचं नाही…
पाऊस कळत नव्हतं का ऊन…
सगळं करावं लागतं होत, आणि मदतीची पण तर अपेक्षा.. कोणाकडून करावी….
सगळ्यांचा होकार… हीच मोठी मदत होती…
संसाराच्या गाड्यासोबत,शिक्षणाचा रथ पण पेलयाचा होता…
कसं बस ,कॉलेज आणि नंतर डी.एड केलं…. आणि पाहिली… शिक्षिकेची नोकरी चालू झाली…
आणि आता मात्र वेगळाच प्रवास चालू झाला…
हे सगळं करत असताना, शेतकरी असल्यामुळे शेतीची पण कामे असायची….
पाहिलं कॉलेज बुडवले तरी चालायचं ,पण आता शिक्षक होते… म्हणून अजून ओढा-ताण करावी लागले…
सूर्याच्या आधी उठाव लागायचं…. आणि पण पायाला भिंगाऱ्या बांधल्या सारख पळायचे….
नंतर मुलं झाली…. त्याच्या जबाबदाऱ्या… गरोदरपण.. अस काही फार चोचले नव्हते माझे… पहिला मुलगा झाला की,लगेच वर्षाने दुसरा पण मुलगा झाला…
एकापाठोपाठ मुलं झाली… जास्त वेळ नाही दिला.. मी म्हणलं एकत्रच वाढतील…. अस पण कुठे मोकळा वेळ आहे…
मुलं झाल्यावर मग सासूबाई मात्र त्यांची काळजी घेत….
त्यांच्या जीवावर सोडून मग पुढे कामाला जात होते…
आणि हो,मुलं पण माझी लवकरच स्वतःची काम ,स्वतः करत होती…आणि सुट्ट्या दिवशी,मग एकत्र सगळे शेतात….
कष्ट पडत होते… पण त्यातच आनंद वाटायचं….
काम चालूच होते… आणि ते कधी संपलं म्हणून वाटत नव्हते….
“दिवस सरून गेले पण बघ पोरी…..”
मुलांच्या लग्नाची वेळ आली…. तस मी माझ्या दोन्ही मुलांना … उच्च शिक्षण दिल… एक MBA तर दुसरा.. MCS झाला आहे…..
स्वतःच्या मुलांना जीव लावणाऱ्या सुंदर अशा दोन मुली पण घरी आणल्या…
प्रत्येक मुलीने स्वतःच्या पायावर उभं असलं पाहिजे,हाच पहिल्यापासून ध्यास होता….
लग्न करून आल्या तेव्हा फार काही,शिक्षण नव्हतं झालं दोघींचे… पण खूप प्रेमळ आहेत… दोघीही…
शिक्षण पूर्ण नाही म्हणून नाकारण्यात मजा नव्हती… लग्न झाल्यानंतर ही शिकू शकतात आणि मी त्यांना प्रोत्साहन तर देईनच पण पाठिंबा तर नक्किच देईल…
ठरवल्या प्रमाणे दोन्ही सुनांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभे केले.. स्वावलंबी बनवल… आणि हो… त्या सध्या दोघी पण मोठ्या पोस्ट वर कार्यरत आहेत..
अर्थात, त्यांना शिकण्याची इच्छा पण तेवढीच होती…
सतीश अगदी हे सगळं शांत राहून ऐकत होता…
प्रिया आता बोलायची थांबली होती…
आणि हो… मन ही गहिवरून आलं होतं…
“आणि बघ ना,सतीश… उद्या त्या रिटायर होणार होत्या…. त्यांनी खूप ठरवलं होतं रे… रिटायर नंतर ची स्वप्न….. “
सतीश मधेच बोलला….
“सायन्स खूप पुढे गेल आहे,उपचाराने बऱ्या होतील त्या.. आणि त्या एवढ्या लढाऊ आहेत म्हणल्यावर नक्की पुढील आयुष्य त्यांच्या जस पाहिजे तस जगतील…”
नाही रे… खंत त्याची नव्हती वाटत की…. त्या त्यांचं आयुष्य जगू शकणार नाहीत म्हणून….
खंत तर ह्याची आहे की,त्यांना आता उपचार घेयाचे च नाहीत… आणि रोज दवाखान्यात… त्यांच्या कुटुंबातील सगळ्यांना त्याची सेवा ही करायला लावायची नाही….
जगायचं नाही… अस नाही… पण उपचारावर जगायचं नाही एवढं मात्र त्यांनी ठरवलं आहे…..
आणि हो,आपसूकच ज्यांना त्यांनी जगायला … स्वावलंबी होयला शिकवलं… त्यांना ही आता काकूंनी जो काही निर्णय घेतला आहे ना,त्याबद्दल थोडी पण हळहळ नाही रे….
त्यांचा जीव तुटत का नाही….
शेवटी,चांगलं एवढं पण वागू नाही रे,की शेवटच्या टप्प्यात पण गृहीत धरलं जावं…”
कदाचित त्यांना जाणीव झाली होती की,ज्यांच्यासाठी आयुष्य वेचल होते त्यांना आता त्याची कदर नसावी….बाकी अजून काय ना!!!!
प्रियाचे हे सगळं ऐकल्यावर मात्र सतीश निःशब्द झाला….
माणुसकी नष्ट होत चालली आहे,हे सगळ्यांना जवळून पाहिलेले असतं… पण जेव्हा संस्कारच नष्ट होतात,तेव्हा काय करायचं….
👍
😊
☺️